नक्षली हल्ल्याचा कट उधळला
By admin | Published: October 17, 2016 05:28 AM2016-10-17T05:28:27+5:302016-10-17T05:28:27+5:30
उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या भागात मोठा हल्ल्ला करण्याचा कट उधळून लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
नोएडा (उत्तर प्रदेश): दहा नक्षलवाद्यांना जेरबंद करून उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या भागात मोठा हल्ल्ला करण्याचा कट उधळून लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. अटक करण्यात आलेल्यांत एका स्वयंघोषित एरिया कमांडरचा समावेश असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
डावे जहालवादी बॉम्ब तयार करीत होते आणि त्यांना दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा त्यांचा इरादा होता, अशी माहिती उत्तर प्रदेश विशेष कृती दलाचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी घाईघाईने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली. रात्रभर धाडसत्र मोहीम राबवून दिल्लीलगतच्या नोएडा येथून नऊ नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. नऊपैकी सहा जणांना शनिवारी रात्री जेरबंद करण्यात आले, तर अन्य तिघांना रविवारी सकाळी उचलण्यात आले. एकाला बिहारलगतच्या चंदौली येथे अटक करण्यात आली. झारंखडमधील लतेहार जिल्ह्यातील बरियातून गावचा स्वयंघोषित कमांडर प्रदीप सिंह खरवार हा फेब्रुवारी २०१२ पासून नोएडात दडी मारून बसला होता. त्याला पकडण्यासाठी ५ लाख रुपयांचा इनामही घोषित करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
>५५० काडतुसांसह शस्त्र-स्फोटके जप्त
विशेष कृती दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या कटकारस्थानाची
खबर लागताच सेक्टर ४९ हिंदोनविहारस्थित एका सदनिकेवर धाड टाकण्यात आली. या ठिकाणांहून ५५० जिवंत काडतुसे, आयएनएसएएस अॅसॉल्ट रायफल, अन्य दोन रायफली आणि तीन मॅगझिन्ससह मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि डिटोनेटर्स जप्त करण्यात आली.
आयएनएसएएस रायफल एका सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून लुटण्यात आली असावी, असा संशय आहे. अटक करण्यात आलेले नक्षलवादी पूर्व उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहारच्या भागात सक्रिय होते. त्यांनी नोएडात तळ बनविला होता. प्रॉपर्टी डीलर्स म्हणून त्यांनी या भागात दोन फ्लॅट भाड्याने घेतले होते.
ही मोहीम चालू ठेवली जाणार असून, आणखी काही जण हाती लागण्याची शक्यता आहे, असे असीम अरुण यांनी सांगितले. इनाम घोषित करण्यात आलेला पीपल्स वॉर ग्रुपचा माजी स्वयंघोषित एरिया कमांडर रणजित पासवान बिहारच्या नक्षलग्रस्त सासाराम जिल्ह्यातील सक्रिय होता. त्याला चंदौली येथून जेरबंद करण्यात आले.