Naxalite Dinesh Gope: कुख्यात नक्षलवादी दिनेश गोप नेपाळमधून अटक; त्याच्यावर होता 30 लाखांचा इनाम...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 02:42 PM2023-05-21T14:42:16+5:302023-05-21T14:43:46+5:30
देशाबाहेर बसून भारतात नक्षलवादी कारवाया करायचा. त्याच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
Naxalite Dinesh Gope:झारखंडमध्ये अनेक वर्षांपासून नक्षलवादी कारवाया करत असलेला कुख्यात नक्षलवादी नेता दिनेश गोपे याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एनआयएच्या सहकार्याने नेपाळमधून अटक केली आहे. दिनेश पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (PLFI) चा प्रमुख आहे. झारखंडमध्ये त्याच्यावर 30 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पोलीस आणि CRPF, दोघेही या नक्षलवादी नेत्याचा 15 वर्षांपासून शोध घेत होते. सध्या तो नेपाळमध्ये लपून बसला होता. दिनेश गोप झारखंडमध्ये अनेक वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचे अनेक साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सध्या सुरू आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच पोलिसांना या नक्षलवाद्याबाबत माहिती मिळाली होती. यामध्ये दिनेश गोप हा वेश बदलून नेपाळमध्ये लपून बसल्याचे सांगण्यात आले. या इनपुटच्या आधारे, दिल्ली पोलिसांनी केंद्रीय एजन्सीसह संयुक्त कारवाई केली आणि रविवारी नेपाळमधील त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरुन त्याला पकडले.
दिनेश गोपे झारखंडमध्ये सर्वाधिक सक्रिय आहे. हा नक्षलवादी नेपाळमध्ये बसून छत्तीसगड आणि झारखंडमध्ये नक्षलवादी कारवाया करत होता. त्यासाठी तो नेपाळमधून आवश्यकतेनुसार ये-जा करत असे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दिनेश गोप याने दाढी वाढवून शिखांप्रमाणे पगडी बांधायला सुरुवात केली होती. नेपाळमध्ये अटक झाली तेव्हाही त्याने पगडी घातली होती. या नक्षलवाद्यांचे नेटवर्क बेल्जियम आणि चीन, पाकिस्तान आणि स्कॉटलंड व्यतिरिक्त देशाबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.