छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:48 PM2024-05-23T19:48:08+5:302024-05-23T19:48:51+5:30
सध्या छत्तीसगडमध्ये SGO, DRG, CRPF, BSF आणि कोब्रा कमांडोसह सुमारे एक हजार जवानांचे पथक नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन चालवत आहे.
Naxalite Encounter :छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना ठार केले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सध्या परिसरात सुरक्षा दलांची शोध मोहिम सुरू आहे, दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढूही शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या छत्तीसगडमध्ये एसओजी, डीआरजी, सीआरपीएफ, बीएसएफ आणि कोब्रा कमांडोसह सुमारे एक हजार जवानांचे पथक नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन चालवत आहे. अलीकडेच कांकेर, बस्तर आणि विजापूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले. या घटनांमध्ये सुरक्षा दलाचे काही जवानही जखमी झाले आहेत. दरम्यान, इनपुटच्या आधारे या पथकांनी गुरुवारी दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांना घेरले.
नारायणपूर-विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या दंतेवाडा येथे नक्षलवादी लपल्याची माहिती होती. या माहितीच्या आधारे नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील डीआरजी आणि बस्तर फायटरसह एसटीएफच्या पथकांनी शोध मोहिमेला सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान जवानांची हालचाल पाहून जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सात नक्षलवादी जागीच ठार झाले, तर 10 ते 12 नक्षलवादी जखमी झाल्याची बातमी आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार, दंतेवाडा एसपी गौरव रॉय आणि बस्तरचे एसपी शलभ कुमार सिन्हा हे जवानांच्या सतत संपर्कात आहेत.