नक्षलवाद्यांकडून भाजपा नेत्याचं आधी अपहरण, नंतर निर्घृणपणे हत्या; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 09:00 PM2024-03-07T21:00:08+5:302024-03-07T21:00:38+5:30
Naxalites Killed BJP Leader : ही घटना जांगला पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. नक्षलवाद्यांनी एका भाजपा नेत्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते कैलाश नाग यांची नक्षलवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. कैलाश नाग हे भाजपा व्यापारी सेलचे मंडळ उपाध्यक्ष होते. कैलास नाग यांचे नक्षलवाद्यांनी आधी अपहरण केले आणि नंतर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. ही घटना जांगला पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जांगला पोलीस ठाण्यापासून केवळ 12 किमी अंतरावर कोटामेट्टा परिसरात संबंधित घटना घडली आहे. या परिसरात वन विभागाकडून तलाव बनवण्याचं काम सुरु आहे. काम सुरु असतानाच बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास या ठिकाणी काही नक्षलवादी आले. नक्षलवाद्यांनी सर्वात आधी तलाव बनवण्यासाठी काम करत असलेल्या जेसीबीला आग लावून जाळले. त्यानंतर जेसीबीचे मालक कैलाश नाग यांचे अपहरण केले.
कैलाश नाग यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर नक्षलवादी त्यांचा मृतदेह फेकून दिला आणि तिथून पळ काढला. कैलाश नाग यांचे वय जवळपास 40 वर्षे इतके होते. ते ठेकेदारीचे काम करत होते. तसेच, भाजपाचे नेते देखील होते. त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत. हत्या झालेल्या परिसरात पोलिसांची गस्ती वाढवण्यात आली आहे.
एका वर्षात 9 भाजपा नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरापासून भाजपाच्या 9 नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. यावर्षी भाजपाच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. कैलास नाग हे नक्षलवाद्यांकडून हत्या झालेले बिजापूर जिल्ह्यातील चौथे भाजपा नेते आहेत. या घटनेवर भाजपा नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, भाजपा नेत्यांनी आरोपी नक्षलवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.