Naxalites News: पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी आपल्याच दोन साथीदारांची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:24 PM2022-01-10T12:24:48+5:302022-01-10T12:25:26+5:30
ठार झालेले दोघे अनेक वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सामील होते. या दोघांविरुद्ध विजापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
विजापूर:छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन आपल्याच दोन साथीदारांची हत्या केल्याची घटना घडली आहे. शेकडो गावकऱ्यांसमोर जनता दरबार भरवून नक्षलवाद्यांनी दोघांची निर्दयीपणे हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नक्षलवाद्यांनी ही घटना 7-8 जानेवारीच्या रात्री घडवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जंगला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विजापूरचे एसपी कमलोचन कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दोघेही नक्षलवादी होत. नक्षलवाद्यांना या दोघांवर पोलिसांचा खबरी असल्याचा संशय होता. त्या संशयावरुनच दोघांची हत्या करण्यात आली आहे. दोन्ही ठार झालेल्यांच्या फाईल्स शोधण्यात आल्या, त्यात हे दोघेही नक्षलवादी असल्याची माहिती समोर आली. तसेच, गेली अनेक वर्षे नक्षलवादी कारवायांमध्ये सामील होते. या दोघांविरुद्ध विजापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नक्षलग्रस्त बेलचर गावात नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी जनता दरबारचे आयोजन केले होते. नक्षलवाद्यांच्या या जनता दरबारात परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. जनता दरबारात भोंगी पोयाम आणि कोत्रापाल येथील रहिवासी बोटी कुहरामी यांना सर्वांमध्ये उभे केले. दोघेही पोलिसांचे खबरी असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर शेकडो गावकऱ्यांसमोर दोघांची हत्या करण्यात आली.
दोन साथीदारांसह तीन जणांची हत्या
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांच्या दोन साथीदारांसह तीन जणांची हत्या केली. बिजापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील गंगलूर पोलिस स्टेशन परिसरात त्यांचे दोन साथीदार कमलू पुनम आणि मिलिशिया सदस्य मांगी यांची हत्या केली आहे.तर, आणखी एका गावकऱ्याचीही नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे.