नक्षलवाद्यांनी मोबाइल टॉवर आणि पंचायतीची इमारत उडवली, काही जणांचे अपहरण केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:44 AM2021-11-23T08:44:42+5:302021-11-23T08:45:01+5:30
घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त मदनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पटणा:बिहारच्याऔरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी एक मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पंचायत इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफची टीम आणि मदनपूर पोलिस घटनास्थळी रवाना झाले असून परिसरात घेराव घातला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
घटना मदनपूरच्या जुदाही भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत नक्षलग्रस्त मदनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुडाही येथे आलेल्या सुमारे डझनभर नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवला. यानंतर आयईडी फोडून पंचायत भवनाचेही मोठे नुकसान केले. याशिवाय नक्षलवाद्यांनी काही लोकांना पकडून जंगलाच्या दिशेने नेल्याचेही बोलले जात आहे.
अपहरण झाल्याची पुष्टी नाहीः एसपी
औरंगाबादचे एसपी कांतेशकुमार मिश्रा यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे एक पथक पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण, काही लोकांचे अपहरण केल्याची पुष्टी अध्याप करता येणार नाही. याची माहिती सध्या घेतली जात आहे, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर स्पष्टपणे यावर बोलता येईल.
सीपीआय-माओवाद्यांकडून बंदची हाक
नक्षलवादी संघटना CPI-Maoist ने 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये बंद पुकारला आहे. आपला सहकारी माओवादी नेता प्रशांत घोष उर्फ किशन दा आणि त्याची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी बंद पुकारला आहे. चार दिवसांच्या कालावधीत नक्षलवाद्यांकडून दुसऱ्यांदा बंद पुकारण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदबाबत बिहार-झारखंडचे पोलिस सर्व महामार्गांवर सतत गस्त घालत आहेत. याशिवाय संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.