नायब सिंह सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; मनोहर लाल यांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 06:28 PM2024-03-12T18:28:26+5:302024-03-12T18:29:11+5:30
Nayab Singh Saini : शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी मनोहर लाल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
Haryana CM Nayab Singh Saini : चंडीगड: लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणातील जनतेला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मंगळवारी संध्याकाळी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याशिवाय एकूण पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी मनोहर लाल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
नायब सिंह सैनी हे ओबीसी प्रवर्गातील असून ते कुरुक्षेत्रचे खासदार आहेत. दरम्यान, जेजेपीसोबतची लोकसभा जागा वाटपाची बोलणी फिस्कटताच आज भाजपाच्या हरियाणा सरकारने राजीनामा दिला होता. यानंतर अपक्षांच्या मदतीने पुन्हा भाजपाने सरकार स्थापन केले असून मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी नायब सिंह सैनी यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला होता.
#WATCH | Haryana BJP president Nayab Singh Saini takes oath as the Chief Minister of Haryana, at the Raj Bhavan in Chandigarh. pic.twitter.com/ULZm5kqwLG
— ANI (@ANI) March 12, 2024
'या' नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!
राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात कंवर पाल गुर्जर यांनीही मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. कंवर पाल गुर्जर हे मनोहर लाल खट्टर सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. मूळचंद शर्मा यांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. मूलचंद शर्मा यांनीही राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अपक्ष आमदार रणजित सिंह हेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत. जयप्रकाश दलाल आणि डॉ. बनवारी लाल यांनीही हरियाणाचे मंत्री म्हणून शपथ घेतली.
अनिल विज शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत
दरम्यान, शपथविधी सोहळ्यादरम्यान अनिल विज हे उपस्थित नव्हते. आज झालेल्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सिंह सैनी यांच्या नावावर अनिल विज खूश नव्हते. या कारणास्तव त्यांनी बैठक सोडली, असे जाणकारांचे म्हणणे आहे. बैठकीनंतर अनिल विज हे सरकारी वाहन आणि ताफा सोडून खासगी वाहनाने अंबाला येथील आपल्या घरी गेले. यादरम्यान त्यांनी अंबाला येथून दप्पड टोल प्लाझा येथे आपली कार मागवली आणि नंतर स्वत: चालवत घरी निघून गेले.