नयनतारा सेहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 04:45 PM2016-01-22T16:45:29+5:302016-01-22T20:30:52+5:30
देशातील वाढत्या असहिष्णूतेचा निषेध म्हणून आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करणा-या नामांकित लेखकांपैकी काहीजण पुन्हा आपले पुरस्कार स्वीकारण्यास राजी झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - देशातील वाढत्या असहिष्णूतेचा निषेध म्हणून आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करणा-या नामांकित लेखकांपैकी काहीजण पुन्हा आपले पुरस्कार स्वीकारण्यास राजी झाले आहेत. देशात पुरस्कार वापसीची मोहिम सुरु करणा-या प्रख्यात लेखिका नयनतारा सेहगल यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत स्वीकारला आहे.
राजस्थानचे लेखक नंद भारव्दाज यांनी अकादमीकडून जो प्रतिसाद मिळाला त्यावर समाधानी असल्याचे सांगितले. देशात जातीयवादी विचार आणि कृतीला जे खतपाणी घातले जात होते त्यावर अकादमीने धारण केलेल्या मौनाचा निषेध म्हणून अनेक लेखकांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले.
सेहगल आणि भारव्दाज यांचा पुरस्कार परत स्वीकारण्याचा निर्णय इतरांसाठी उदहारण असला तरी, यावर अजूनही साहित्यिकांमध्ये मतभेद आहेत. अकादमीचे वर्तन आणि कृती समाधानकारक आहे त्यामुळे मी पुरस्कार परत स्वीकारण्याचा निर्णय घेतला असे भारव्दाज यांनी सांगितले. त्यांनी आपला पुरस्कार आणि त्यासाठी मिळालेली ५० हजाराची रोख रक्कम परत केली होती.
दिलेला पुरस्कार परत स्वीकारणे धोरणाच्या विरोधात असल्याचे अकादमीने मला पत्र लिहून कळवले. त्यामुळे मी पुरस्कार परत स्वीकारला. पुरस्काराच्या रक्कमेचा चांगल्या विधायक कामासाठी उपयोग करीन असे नयनतारा सेहगल यांनी सांगितले.