राम कदम यांच्याविरोधात एनसी दाखल
By admin | Published: September 26, 2014 02:16 AM2014-09-26T02:16:20+5:302014-09-26T02:16:20+5:30
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान धार्मिक प्रचार केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात आलेले आमदार राम कदम यांच्याविरोधात अदखलपात्र तक्राल (एनसी) नोंदवण्यात आली
मुुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान धार्मिक प्रचार केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात आलेले आमदार राम कदम यांच्याविरोधात अदखलपात्र तक्राल (एनसी) नोंदवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेली तक्रार पोलिसांकडे धाडून कारवाईचे आदेश दिले. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.
लोकवर्गणीतून उमेदवारी अर्ज भरण्याचा निश्चय कदम यांनी केला आहे. त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते घाटकोपर पश्चिम मतदारसंघात फिरून एकेक रूपया वर्गणी म्हणून गोळा करत आहेत. गेल्या पाचेक दिवसांपासून लोकवर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र वर्गणी गोळा करण्यासाठी कदम यांच्याकडून कार्यकर्त्यांना जे डबे मिळाले आहेत त्यावर साईबाबांचा फोटो आहे. त्याला शिवसेनेचे विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी आक्षेप घेतला. कदम मतदारसंघात धार्मिक प्रचार करत आहेत, हे अचारसंहितेचे उल्लंघन आहे, असा आरोप करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली.
घाटकोपर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना गेवराईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतनगर परिसरात साईबाबांची रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीच्या आधारे कदम यांच्या उमेदवारी अर्जासाठी कार्यकर्ते वर्गणी देण्याचे आवाहन मतदारांना करत होते, अशीही तक्रार मोरे यांनी केली. या तक्रारीत तथ्य आढळल्याने ती पुढील कारवाईसाठी पार्कसाईट पोलीस ठाण्याकडे धाडण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार कदम यांच्याविरोधात एनसी नोंदविल्याचे पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक सुरेश सकपाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)