NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह; दीपिकाची केली होती चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 09:14 AM2020-10-04T09:14:06+5:302020-10-04T09:16:49+5:30
NCB Deputy Director KPS Malhotra :अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत.
नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये ड्रग सिंडिकेटच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे(एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला परतले आहेत.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबी एसआयटी टीमने दीपिका पादुकोणची बराच वेळ चौकशी केली होती. या टीमचे नेतृत्व केपीएस मल्होत्रा करीत आहेत.
दीपिका पादुकोण हिची २६ सप्टेंबरला जवळपास साडे-पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी तिला सुशांतसिंह राजपूत किंवा रियाशी संबंधित कोणताही प्रश्न चौकशीत विचारला गेला नाही. एनसीबीचे संपूर्ण लक्ष दीपिकाच्या करिश्माच्या चॅटवर होते, ज्यात ती ड्रग्जबद्दल बोलत होती. तसेच, दीपिकानेही त्या चॅट संदर्भात एक मोठा कबुलीजबाब दिला आहे. ज्या चॅटमध्ये ड्रग्सविषयी बोलले जात होते. त्याचाच तो एक भाग आहे, असे दीपिकाने कबूल केल्याचे म्हटले जाते.
एनसीबीची टीम ज्यावेळी दीपिकाची चौकशी करत होती. त्यावेळी दीपिकाला तीनवेळा अश्रू अनावर झाले. त्यानंतर एनसीबी अधिका्यांनी तिला इमोशनल कार्डे न खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच, जर ती सर्व काही सत्य सांगत असेल तर तिच्यासाठी ते अधिक चांगले राहील, असे दीपिकाला सांगण्यात आले होते.
सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या, एम्सचा अहवाल
बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा निष्कर्ष एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी काढला आहे. त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, यादृष्टीने सीबीआय तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. सुशांतने आत्महत्याच केली अशा निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस आले होते. पण मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगून सुशांतचे कुटुंबीय आणि बिहार पोलिसांनी तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती. सुशांतसिंह याचा शवचिकित्सा अहवाल व अन्य बाबींची फेरतपासणी डॉ. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने केली. सुशांतसिंह याच्या व्हिसेराचा २० टक्के नमुना फेरतपासणीसाठी उपलब्ध असल्याने, त्याची तपासणी करून एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने हा निष्कर्ष काढला आहे. सुशांतसिंह प्रकरणी फोरेन्सिक तज्ज्ञांनी एक लॅपटॉप, दोन हार्डडिस्क, कॅनन कॅमेरा व दोन मोबाइल फोनचीही बारकाईने तपासणी केली आहे.