शरद पवार भाजपला धक्का देणार? माजी खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:58 PM2022-05-11T21:58:45+5:302022-05-11T22:01:52+5:30

भाजपच्या मतपेढीवर शरद पवारांचा डोळा? बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाची चर्चा

ncp chief sharad Pawar Belagavi bid to unveil Rani Chennamma statue sets BJP abuzz | शरद पवार भाजपला धक्का देणार? माजी खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

शरद पवार भाजपला धक्का देणार? माजी खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

Next

मुंबई/बेळगाव: राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काल कर्नाटकच्या बेळगावात होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद कायम असताना पवार बेळगावात गेले. पवारांच्या बेळगाव भेटीनं भाजपची चिंता वाढली आहे. भाजपचा माजी खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

शरद पवार काल बेळगावातील कित्तूरमध्ये होते. त्यांनी राणी चेन्नाम्मा यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. राणी चेन्नाम्मा यांनी ब्रिटिशांविरोधात संघर्ष केला होता. चेन्नाम्मा यांच्या त्यागामुळे येणाऱ्या पिढ्यांना, विशेषत: महिलांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. पवार यांना स्मारकाच्या उद्घाटनासाठी भाजपचे माजी खासदार प्रभाकर कोरेंनी आमंत्रित केलं होतं. कोरे लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांनीच पवारांना आमंत्रित केल्यानं भाजपला चिंता वाटू लागली आहे.

प्रभाकर कोरे राज्यसभेचे खासदार होते. शरद पवारदेखील राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे दोघांचे जुने संबंध आहेत. कोरेंनी दिलेल्या आमंत्रणाचा राजकीय अर्थ काढू नका, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलं. 'पवार यांचे देशभरातील राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचं, पुतळ्यांचं लोकार्पण केलं आहे,' असं पाटील यांनी सांगितलं.

प्रभाकर कोरे यांचं लिंगायत समाजात चांगलं वर्चस्व आहे. ते पक्षावर नाराज आहेत, असं भाजपच्या एका नेत्यानं सांगितल्याचं द इंडियन एक्स्प्रेसनं वृत्तात म्हटलं आहे. कोरे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता आहे. अन्यथा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना कार्यक्रमासाठी का आमंत्रित केलं असतं, असा सवाल या नेत्यानं विचारला. भाजपच्या एका आमदारानं मात्र हा कार्यक्रम समाजाचा होता असं म्हटलं. 'माझ्या माहितीनुसार, तो कार्यक्रं भाजपचा नव्हता. लिंगायत समाजानं कार्यक्रम आयोजित केला होता. कोरे आणि पवार यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत,' असं भाजप आमदार अभय पाटील यांनी सांगितलं.

Web Title: ncp chief sharad Pawar Belagavi bid to unveil Rani Chennamma statue sets BJP abuzz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.