“मनात शंका आणू नका, आपल्याला भाजपसोबत...”; शरद पवारांचे मोठे विधान, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:24 PM2023-08-08T12:24:35+5:302023-08-08T12:24:40+5:30
Sharad Pawar: शरद पवार भाजपला पाठिंबा देणार की, विरोधातच राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Sharad Pawar: लोकसभेनंतर दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या विजयामुळे आम आदमी पक्ष तसेच विरोधकांना मोठा धक्का बसला. यासंदर्भात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून कुठलाही व्हिप काढण्यात आला नव्हता. तसेच शरद पवार या विधेयकाला विरोध करण्यासाठी सभागृहात हजर होते. पण प्रफुल्ल पटेल यांनी दांडी मारली. यानंतर शरद पवारांनी दिल्लीत पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना भूमिका स्पष्ट केली, असे सांगितले जात आहे.
अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. तर, शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. शरद पवार गटातील आमदारांची संख्या कमी असल्याने त्यांना विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडाव लागले. शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून प्रयत्न सुरू आहे. शरद पवार हे भाजपला पाठिंबा देणार की, विरोधातच राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच शरद पवार यांनी दिल्लीत पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भूमिका स्पष्टपणे मांडली, अशी माहिती देण्यात आली आहे.
पक्षाचे नाव, चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत दबाव
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत केंद्राकडून दबाव आहे. पण काहीही झाले तरी आपण पुन्हा सगळे उभे करू. काहीही झाले तरी आपण तडजोड करणार नाही, आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. मनात कुठेही शंका आणू नका. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून या पुरस्काराला शरद पवारांनी जाऊ नये, असे आवाहन करत, अप्रत्यक्षरित्या दबाव आणल्याचे पाहायला मिळाले.