शरद पवारांनी घेतली गौतम अदानींची भेट; अहमदाबादमध्ये दोघांत अर्धा तास खलबतं, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 08:06 PM2023-09-23T20:06:33+5:302023-09-23T20:08:52+5:30
Sharad Pawar Meet Gautam Adani: शरद पवार आणि गौतम अदानी यांची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी भेट असल्याचे सांगितले जात आहे.
Sharad Pawar Meet Gautam Adani: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची भेट घेतली. गुजरातमधील अहमदाबाद येथे गौतम अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार गेले होते. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगितले जाते. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील या भेटीनंतर चर्चांना उधाण आले असून, राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार आणि गौतम अदानी यांची यापूर्वीही दोनदा भेट झाली होती. हिंडनबर्गच्या अहवालानंतर २० एप्रिल २०२३ ला गौतम अदानी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, दुसरी भेट २ जून २०२३ मध्ये झाली होती. शरद पवार आणि गौतम अदानी यांची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी भेट असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार खाजगी कार्यक्रमासाठी गुजरातला गेले होते.
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात अर्धा तास चर्चा
एका खासगी कार्यक्रमात सहभागी होताना शरद पवार यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली. अहमदाबादमध्ये दोघांच्या भेटीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पुण्यातील एका उद्योगपतीच्या फॅक्टरी उद्घाटनासाठी शरद पवार आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल, त्यात वेगळे काय आहे. शरद पवार हे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पॉलिसी करत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या मनात काय आहे? हे कुणी सांगू शकत नाही. ते अंतरयामी आहेत. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे शरद पवार यांनाच माहिती असते. शरद पवार हे गौतम अदानींचे मित्र आहेत. गौतम अदानी हे शरद पवारांची वारंवार भेट घेत असतात. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.