आधी दोन बडे मंत्री पवारांना भेटले अन् मग पवारच मोदींच्या भेटीला गेले; वाचा नेमके काय घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 01:24 PM2021-07-17T13:24:18+5:302021-07-17T13:27:02+5:30
राजकीय वर्तुळात पंतप्रधान मोदी आणि पवारांच्या भेटीची जोरदार चर्चा
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. अनेक राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करत असतानाचा फोटोदेखील ट्विट केला आहे.
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील भेटीमागील घटनाक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. आज पवार आणि मोदींनी पंतप्रधान कार्यालयात तासभर चर्चा झाली. त्याआधी भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी पवारांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले.
मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि लडाखमधील सीमावर्ती भागातील चीनच्या हालचाली हे दोन मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. विरोधक हे दोन्ही मुद्दे अधिवेशनात लावून धरू शकतात. त्याच अनुषंगाने मोदी-पवारांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्याआधी राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी निवड झालेले पियूष गोयल यांनी कालच पवारांची भेट घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील पवारांची भेट घेत त्यांना लडाखमधील चीनच्या हालचाली आणि भारताची स्थिती याबद्दल माहिती दिली. त्यामुळे संसदेत चीन आणि शेतकरी आंदोलनाचा मुद्दा फारसा चर्चिला जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे.
देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी
भाजपचे केंद्रातले बडे मंत्री शरद पवारांची भेट घेत असताना राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील दिल्लीवारी करून आले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काही नवनियुक्त मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र फडणवीसांच्या दिल्ली भेटीचं टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे. काल फडणवीस दिल्लीत होते. आज सकाळी ते नागपूरला परतले आणि त्यानंतर पवार-मोदींची भेट होते, हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.