Rafale Deal: 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'चं काय झालं? शरद पवारांचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:32 PM2019-03-07T13:32:50+5:302019-03-07T13:34:12+5:30

राफेल डीलवरुन विरोधकांचा आक्रमक पवित्रा

ncp chief sharad pawar slams pm narendra modi over rafale deal | Rafale Deal: 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'चं काय झालं? शरद पवारांचा मोदींना सवाल

Rafale Deal: 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'चं काय झालं? शरद पवारांचा मोदींना सवाल

मुंबई: राफेल डीलबद्दलची महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती काल मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. यानंतर आता विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यासोबतच 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' घोषणेचं काय झालं, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. 

शरद पवारांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राफेल करारावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'राफेल विमान खरेदी प्रकरणातील सरकारची भूमिका अस्वस्थ करणारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधकांनी केली होती. मात्र सरकारनं चौकशीस नकार दिला,' असं शरद पवार म्हणाले. पंतप्रधान मोदींनी ना खाऊंगा ना खाने दूंगा अशी घोषणा दिली होती. त्या घोषणेचं काय झालं, असा प्रश्न यावेळी पवारांनी विचारला. 

राफेल डील प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी या डील संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी दिली. पंतप्रधान कार्यालयानं राफेल डीलमध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचं वृत्त 'द हिंदू' वृत्तपत्रानं काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे 'दिलं होतं. ही कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. 'द हिंदू'नं ज्या कागदपत्रांच्या आधारे राफेल डीलबद्दलचं वृत्त दिलं, ती कागदपत्रं सादर केल्यास देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचेल, असा दावा वेणुगोपाल यांनी केला. यानंतर याचिकाकर्ते आणि वकील प्रशांत भूषण यांनी युक्तिवाद केला. सरकारनं न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप भूषण यांनी केला.  
 

Web Title: ncp chief sharad pawar slams pm narendra modi over rafale deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.