आपली प्रसिद्धी होईल यासाठीच काम करणार ही कार्यपद्धत अयोग्य; नवाब मलिकांचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:51 PM2021-05-03T12:51:43+5:302021-05-03T12:54:23+5:30
Coronavirus : निवडणुकांसाठी, भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली, मलिक यांचा आरोप
"आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपद्धत योग्य नाही," अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
निवडणुकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. "आता हे सगळं सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा," अशी सूचनाही नवाब मलिक यांनी केली आहे.
आजही ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण नाही
मुंबई पालिकेकडे लसीचा साठा अपुरा असल्याने सोमवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सोमवारी नायर, बीकेसी, सेव्हर हिल, राजावाडी आणि कुपरमध्ये सुरू राहील. ज्यांनी यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे त्यानांच तेथे लस मिळेल. सध्या ६३ केंद्रे, तसेच ७३ खासगी रुग्णालये मिळून १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहील. तेथे या वयोगटातील प्रत्येकी ५०० नागरिकांचे रोज सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण केले जाईल. सध्या तेथे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य आहे. साठा उपलब्ब्ध होईल, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.