रणनीतीसाठी राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक, पाच राज्यांतील विधानसभा तसेच लाेकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 07:23 AM2023-06-29T07:23:16+5:302023-06-29T07:24:32+5:30
NCP: कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दिवसभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका झाल्या.
- सुनील चावके
नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी तसेच पक्षकार्याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या. या बैठकांसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नव्हते; तसेच त्यांचा पोस्टर्सवर चेहराही झळकला नाही, याचीच चर्चा सुरू होती.
कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दिवसभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका झाल्या. या बैठकींना नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड तसेच अन्य राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते.
अजितदादांना निमंत्रणच नव्हते
- या बैठकीसाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे छायाचित्र नव्हते आणि त्यांना या बैठकीसाठी निमंत्रितही करण्यात आले नव्हते, याकडे पटेल यांचे लक्ष वेधले असता या बैठकीशी अजित पवार यांचा संबंधच येत नाही.
nते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असले तरी राष्ट्रीय पदाधिकारी नाहीत. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कोणत्याही सदस्याला आजच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष कधी ठरणार?
महाराष्ट्रात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कोणाला प्रदेशाध्यक्ष करायचे हा विषय येईल. आज कोणी इच्छा व्यक्त केली तर त्याविषयी उद्याच निर्णय होईल असे समजायचे कारण नाही. पक्ष त्याविषयी योग्य निर्णय घेईल, असे प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर बोलताना पटेल म्हणाले.