“ही नैतिकता अन् सत्याची लढाई, मला वाटले नव्हते की हा दिवस येईल”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 02:59 PM2023-10-13T14:59:49+5:302023-10-13T15:00:48+5:30
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
Supriya Sule News: आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असून, या प्रक्रियेत मुद्दामहून वेळकाढूपणा केला जात असल्याचे आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्य पद्धतीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. चार महिने उलटून गेले असले तरी यावर कार्यवाही न झाल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही नैतिकता आणि सत्याची लढाई आहे, असे म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. यानंतर, हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात आहे. मंगळवारी नवीन वेळापत्रक सादर करावे अन्यथा थेट आदेश देऊ, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी फटकारले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
हा विषय नैतिकतेचा आहे, ही लढाई नैतिकतेची आहे
मी आयुष्यात पहिल्यांदाच न्यायालयाची पायरी चढली आहे. मी कोर्टबाजीसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य माय-बाप जनतेची सेवा आणि चांगले धोरण आखण्यासाठी आले होते. मला वाटले नव्हते हा दिवस येईल. शेवटी ही सत्याची लढाई आहे. सत्यासाठी जे काही करावं लागेल ते करेन. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे असंख्य कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रात पवारांनी अनेक वर्ष केलेले काम आणि मायबाप जनतेचे प्रेम आणि आशीर्वादामुळे आम्ही उभे आहोत. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे आहोत. हा वैयक्तिक वाद नाही की पवार कोणती निवडणूकही लढवणार नाहीयत. हा विषय नैतिकतेचा आहे, ही लढाई नैतिकतेची आहे. सत्य आणि असत्याची ही लढाई आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या प्रकरणाची सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याबाबत विनंती केली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रकरण एकत्रित केले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला न्यायालय न्याय देईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.