मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 07:10 PM2019-02-13T19:10:55+5:302019-02-13T19:14:11+5:30

सुप्रिया सुळेंच्या विधानात शरद पवारांच्या शैलीची झळक

ncp mp supriya sule reacts after mulayam singh backs narendra modi for pm | मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात...

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात...

Next

नवी दिल्ली: राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याचाच प्रत्यय आला. राजकारणात कोण कधी कोणाची बाजू घेईल आणि कोण कोणाच्या विरोधात जाईल, याची प्रचिती आज लोकसभेत आणि लोकसभेबाहेरदेखील आली. समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यांनी चक्क नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मोदींना शुभेच्छादेखील दिल्या. मुलायम यांची ही इच्छा ऐकून मोदींच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या या विधानावरुन सूचक प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे सुप्रिया यांच्या विधानात पवार स्टाईलची झलक पाहायला मिळाली.

सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुलायम सिंह यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मी पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असं मला वाटतं. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व सदस्य निवडून यावेत आणि तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हावं, असं वक्तव्य मुलायम यांनी केलं. मुलायम सिंह यांच्या या विधानानंतर लोकसभेच्या पुढच्या बाकावर बसलेल्या सोनिया गांधींनाही हसू आलं. मुलायम सिंह यांच्या या इच्छेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सदनाबाबेर सूचक भाष्य केलं. 2014 मध्येही मुलायम सिंह यांनी अशीच इच्छा व्यक्त केली होती, याकडे सुळे यांनी लक्ष वेधलं. 

'मुलायम सिंह यांचं विधान मी ऐकलं. ते 2014 मध्येदेखील असंच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते,' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळेंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये शरद पवारांच्या शैलीत मुलायम यांच्या विधानावर भाष्य केल्याची चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली. मुलायम यांनी 2014 मध्ये मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचं सरकार गेलं. आता त्याच मुलायम सिंहांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुढचं काय ते समजून जा, असा अर्थ सुळे यांच्या विधानामागे असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. 
 

Web Title: ncp mp supriya sule reacts after mulayam singh backs narendra modi for pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.