राष्ट्रवादीला माने-यड्रावकर यांच्या ताकदीची गरज
By admin | Published: January 10, 2017 02:19 AM2017-01-10T02:19:57+5:302017-01-10T02:19:57+5:30
खोची / आयुब मुल्ला : हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जिल्हा नेतृत्वाकडून हातकणंगले, शिरोळ तालुक्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा पाढाच वाचला गेला. त्यामुळे रविवारचा मेळावा हा जिल्हा नेतृत्वाला लक्षवेधी सूचना देणारा ठरला, तर कार्यकर्त्यांना रिचार्ज करणाराही ठरला.
Next
ख ची / आयुब मुल्ला : हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जिल्हा नेतृत्वाकडून हातकणंगले, शिरोळ तालुक्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा पाढाच वाचला गेला. त्यामुळे रविवारचा मेळावा हा जिल्हा नेतृत्वाला लक्षवेधी सूचना देणारा ठरला, तर कार्यकर्त्यांना रिचार्ज करणाराही ठरला.माजी खासदार निवेदिता माने व शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपल्यातील नाराजीची खदखद व्यक्त केली. याची दखल घेत वस्तुस्थिती समजावून घेत, अखेर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी माने-यड्रावकर यांच्या सहकार्यावर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकू शकतो, असे सांगितले.दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे झालेला मेळावा महत्त्वपूर्ण झाला होता.मेळाव्याला प्रतिसाद मिळणार की नाही, याविषयी तालुक्यात चर्चा होती; परंतु माजी खासदार निवेदिता माने यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील बर्याच कार्यकर्त्यांनी माने गटाकडे पक्षाने केलेल्या दुर्लक्षाची दखल घेत नाराजी व्यक्त केली.निवेदिता माने यांनीसुद्धा जिल्ातील पक्षाचे नेते कसे चुकले आहेत, हे सांगितले. या नेत्यांनी शक्तिस्थळे असणार्या तालुक्यांकडे अधिक लक्ष देत शिरोळ, हातकणंगलेकडे दुर्लक्ष क रीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला; परंतु आम्ही पक्षावरची निष्ठा कमी होऊ देणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर पंचायत समितीवर झेंडा फडकवू, तसेच जिल्हा परिषद सदस्यही जास्त निवडून आणू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. कोणत्याही निवडणुका आल्या की, आमच्याबद्दल इतर पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा काहीजण मुद्दाम करतात; परंतु शरद पवार यांच्यावर निष्ठा असल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा संबंधच येत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली. त्यांनीही पक्ष नेत्यांच्या भूमिकेवर तोफ डागली. शिरोळ तालुक्यात पर्यायी गट तयार करण्यास मदत केली जाते, असा आरोप केला. पक्षाच्या विरोधात नेतेच येतात. नगरपालिका निवडणुकीत शक्ती देण्याचे सोडाच, पण साधी सहानुभूतीसुद्धा दाखविली गेली नाही, तरीसुद्धा बहुमत सिद्ध केले. यापुढे स्थानिक नेतृत्वाला विचारूनच निर्णय घ्या. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. निष्ठा तपासण्यासाठी नवीन थर्मामीटर वापरा. हातकणंगलेत अकरा, तर शिरोळमध्ये सात असे अठरा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. इकडे लक्ष दिले तरच सत्ता येऊ शकते, असा टीकात्मक समाचार घेत सल्ला दिला. पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही तालुक्यांत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.निवेदिता माने व राजेंद्र पाटील यांनी आपल्यातील खदखद व्यक्त केली. सूचना केल्या. पुन्हा नव्याने लढण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषणाला प्रचंड टाळ्यांची साथ दिली.जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता यावयाची असेल, तर माने-यड्रावकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य उपयोगी असल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक नेतृत्वाला सर्व अधिकार दिल्याचे त्यांनी घोषित केले.त्यामुळे निवेदिता माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना हातकणंगले, शिरोळचे सर्व अधिकार निवडणुकीसाठी दिले, असे सांगावे लागले.तालुकाध्यक्ष डी. बी. पिष्टे, बी. एम. माळी, प्रा. बी. के. चव्हाण, गुंडा इरकर यांनी मेळाव्याचे चांगले नियोजन केले. यानिमित्त नेत्यांना मनसोक्त बोलता आले. कार्यकर्त्यांचा सभ्रम दूर झाला. कार्यकर्ते रिचार्ज झाले.