रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:22 PM2023-05-01T13:22:39+5:302023-05-01T13:24:39+5:30
Karnataka Election 2023: आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा, असे आवाहन रोहित पवारांनी केल्याचे म्हटले जात आहे.
Karnataka Election 2023: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धूम पाहायला मिळत आहे. भाजपसाठी कर्नाटकाचा गड राखणे आव्हानात्मक ठरणार असून, विरोधकांकडून भाजप, केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील नेते, मंत्री कर्नाटकात प्रचारासाठी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील बेळगावात प्रचाराला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार कर्नाटकात प्रचारासाठी पोहोचले असून, बेळगावात त्यांनी एका रॅलीत सहभाग नोंदवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवली जात आहे. मात्र, बेळगांव दक्षिण (कर्नाटक) विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ रॅलीत रोहित पवार सामील झाले. यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेला रोहित पवार यांनी संबोधितही केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजीराव आष्टेकर, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण पाटील, सुधाताई भातखंडे, सरिताताई पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा
फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांना दूर करा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन रोहित पवार यांनी यावेळी केले. मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मी या ठिकाणी मराठीसाठी लढणाऱ्या लोकांसोबत लढण्यासाठी आलो आहे. मराठी भाषिक कधीही इतर भाषा किंवा समाजाच्या विरोधात नसतात. बंगळूर येथे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या कोंडुसकर यांच्यासह कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. त्यामुळेच आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा. विधानसभेची लढाई सोपी नाही मात्र भ्रष्टाचार आणि हुकुमशाही गाढण्यासाठी सर्वांना संघटित व्हावे लागेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, हजारो कार्यकर्ते रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी भगवे ध्वज आणि वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेऊन दाखल झाले होते. पाटील गल्ली, कारभार गल्ली, नाझर कॅम्प, वडगाव रोड, नाथ पै सर्कल, खडे बाजार भागातून रोड शो केला. यात १० हजारांहून अधिक युवक, महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रोड शोची सांगत झाल्यानंतर शिवसृष्टी समोर सभेचे आयोजन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"