“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 18:55 IST2024-02-19T18:53:26+5:302024-02-19T18:55:58+5:30
NCP Supreme Court News: सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली.

“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
NCP Supreme Court News:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावरुन याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरील सुनावणीत शरद पवार गटाच्या दोन मागण्या मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला काही प्रश्न उपस्थित करत त्यावर उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली.
आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरते नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हेच नाव निवडणुकीपर्यंत राहू द्या, अशी मागणी शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. यावर, शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यानंतर त्यांना एक आठवड्यात चिन्हे दिले जावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय
मला खूप आनंद आहे की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले केले की, ते या देशातील लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि संरक्षण करू इच्छित आहेत. दहावी सूची स्पष्टपणे सांगते की, जोपर्यंत तुम्ही राजकीय पक्षात विलीन होत नाही तोपर्यंत तुमची स्वतंत्र ओळख असू शकत नाही. त्यानुसार माझ्या मते अजितदादांच्या गटाला शरद पवार यांना उद्ध्वस्त करायचे आहे. त्यांना शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उखडून काढायचे आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
दरम्यान, मुकुल रोहतगी तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या (आयोगाच्या) आदेशात काय लिहिलेय? दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरले नाही. स्प्लीट वगळून मर्जरची तरतूद करण्यात आली. त्याचा उद्देश काय होता? पण यामध्ये मतदारांचे काय?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली. यावर, अजित पवार गटाला पुढील दोन आठवड्यात उत्तर द्यावे लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होणार आहे.