“होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:50 AM2024-01-17T11:50:32+5:302024-01-17T11:51:57+5:30

Sharad Pawar to Visit Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून, या सोहळ्यासाठी शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ncp sharad pawar wrote letter to champat rai after receives an invitation to attend pran pratishtha ceremony of ayodhya ram mandir | “होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र

“होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र

Sharad Pawar to Visit Ayodhya Ram Mandir: राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सोहळ्यापूर्वी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठान, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिर मुद्द्याचे भाजपा धार्मिक राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यातच निमंत्रणावरूनही मानापमान नाट्य रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निमंत्रण मिळाले असून, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याचे म्हटले आहे. 

राम मंदिराच्या भव्य सोहळ्यासाठी देशातील मान्यवरांसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रणे देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसने राम मंदिराच्या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही काँग्रेसप्रमाणे राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, यावरून विरोधकांमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना शरद पवार यांनी एक पत्र लिहिले आहे.

होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार

या पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे की, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम केवळ भारताचे नाही, तर जगभरात पसरलेले कोट्यवधी भाविक आणि श्रद्धाळूंच्या आस्थेचे प्रतिक आहेत. अयोध्येत होत असलेल्या सोहळ्याबाबत रामभक्तांमध्ये मोठी उत्सुकता आणि आतुरता आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक तेथे पोहोचत आहेत. त्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन सहज, सुलभतेने आणि आरामात घेता येईल. अयोध्येला येण्याचा माझा कार्यक्रम आहे. त्यावेळेस श्रद्धापूर्वक रामलला दर्शन करेन. तोपर्यंत राम मंदिराचे कामही पूर्ण झाले असेल. आपल्या स्नेहपूर्ण निमंत्रणाबाबत पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. या सोहळ्यासाठी माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा, अशा आशयाचे पत्र शरद पवार यांनी चंपत राय यांना लिहिले आहे. 

दरम्यान, निपाणी येथील एका मेळाव्याला संबोधित करताना, राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी १० दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास  देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करणार का, अयोध्येचा श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळेस झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.
 

Web Title: ncp sharad pawar wrote letter to champat rai after receives an invitation to attend pran pratishtha ceremony of ayodhya ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.