गुजरातच्या रिंगणात राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, सपा आणि जदयूही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:32 AM2017-11-29T01:32:11+5:302017-11-29T01:32:30+5:30

गुजरात विधानसभेसाठी भाजपा व काँग्रेस या प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, त्या सर्वांनी अर्जही दाखल केले आहेत. पण त्यांच्याखेरीज इतरही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

NCP, Shivsena, BSP, SP and JD | गुजरातच्या रिंगणात राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, सपा आणि जदयूही

गुजरातच्या रिंगणात राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, सपा आणि जदयूही

googlenewsNext


अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी भाजपा व काँग्रेस या प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, त्या सर्वांनी अर्जही दाखल केले आहेत. पण त्यांच्याखेरीज इतरही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शंकरसिंह वाघेला यांचा जन विकल्प पक्ष, बहुजन समाज पार्टी , समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दलातून बाहेर पडून भारतीय आदिवासी पक्ष स्थापन करणारे विद्यमान आमदार छोटुभाई वसावा यांचे उमेदवारही गुजरातमध्ये आहेत.

शंकरसिंह वाघेलाच रिंगणात नाहीत
काँग्रेसमधून बाहेर पडलेले आणि जनविकल्प पक्ष स्थापन करणारे शंकरसिंह वाघेला यांचा भाजपाने उपयोग करून घेतला. त्या पक्षाने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरवले होते. पण त्यांना ७९ उमेदवारच मिळाले. राष्ट्रवादीप्रमाणेच काही ठिकाणी जनविकल्प पक्ष काँग्रेसची मते फोडेल, असे भाजपाला वाटते. त्यामुळे जनविकल्पच्या काही उमेदवारांना भाजपा सर्व मदत करीत आहे. शंकरसिंह वाघेला आणि त्यांचे पुत्र हे स्वत: रिंगणात उतरलेले नाहीत, याचाच अर्थ त्यांना स्वत:चीच खात्री नसावी.

नितीश कुमारांनी दिले ११ उमेदवार
छोटुभाई वसावा बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ११ उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी एक वसावा यांच्याविरोधात उभा आहे.

राष्ट्रवादी लढतेय ७२ जागांवर
भाजपासाठी फायद्याचे ठरू शकते मतांचे विभाजन
राष्ट्रवादीला इच्छा होती काँग्रेसशी आघाडी करण्याची. पण राष्ट्रवादीच्या एका आमदाराने राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांच्याऐवजी भाजपाला मतदान केल्याने काँग्रेस नाराज होती. शिवाय राष्ट्रवादीला १६ जागा हव्या होत्या. त्या द्यायलाही काँग्रेसने नकार दिल्याने आम्ही सर्व १८२ जागा लढवू, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. पण त्यांना तितके उमेदवार मिळालेच नाहीत. त्यामुळे तो पक्ष ७२ जागांवर लढत आहे.
राज्यात फारशी ताकद नसली तरी भाजपविरोधी मते फोडून भाजपाला फायदा मिळवून देण्याचे काम राष्ट्रवादी करेल, असे बोलले जाते. सूरतमधील ९ पैकी ६ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसला निश्चितच त्रास देतील. त्यातच काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले अनेक जण राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढत आहेत.

सपाला काँग्रेसने एकही जागा न सोडल्याने त्यांचे पाच उमेदवार रिंगणात आहेत.
बसपाने गुजरातमध्ये ताकद नसली तरीही १६५ उमेदवार उभे केले आहेत.

मते फोडण्याची भाजपाची खेळी
राष्ट्रवादी, जनविकल्प, बसपा यांच्या काही उमेदवारांना भाजपा विशिष्ट मतदारसंघात आर्थिक मदत करीत असल्याची चर्चा आहे. हे पक्ष काँग्रेसची मते फोडू शकतीय या अंदाजाने भाजपा हे करीत आहे. तसे प्रत्यक्षात घडते का, हे आताच सांगणे अवघड आहे.

सेनेचे उमेदवार वेगळ्या चिन्हावर, भाजपासाठी त्रासदायक
शिवसेनेने ५0 ते ६0 जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. सेनेचे उमेदवार रिंगणात असले तरी ते वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते काही ठिकाणी भाजपाची मते फोडण्याचा प्रयत्न करतील. पण भाजपा गुजरातेत शिवसेनेची दखलही घ्यायला तयार नाही.

Web Title: NCP, Shivsena, BSP, SP and JD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.