केंद्राची झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारली; म्हणाले, "कुठला धोका आहे ते मी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:43 PM2024-08-30T14:43:58+5:302024-08-30T15:01:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारची झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारली आहे.
Sharad Pawar on Z Plus Security : केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. शुक्रवारी दिल्लीत यासंदर्भातील चर्चेसाठी काही अधिकारी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र आता शरद पवार यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारल्याचे समोर आलं आहे. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. मात्र आता ही सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे. सुरक्षा नाकारण्याचे कारणरही शरद पवार यांनी सांगितल्याचे म्हटलं जात आहे.
शरद पवार यांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. सुरक्षा दलाचे वाहन घेण्यासही पवारांनी नकार दिला आहे. नुकतीच केंद्र सरकारने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांचे अधिकारी सकाळीच शरद पवार यांच्या घरी दाखल झाले होते. १५ सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. मात्र सुरक्षा घेण्याच्या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही.
आजतकच्या वृत्तानुसार, आपल्याविरुद्ध कोणत्या प्रकारचा धोका आहे हे आपण आधी तपासू, त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी गृह मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांकडून माहितीही मागवली आहे.
माहिती मिळवण्यासाठी झेड प्लस सुरक्षा - शरद पवार
दरम्यान, झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं होतं. "गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारलं तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी. नक्की काय हे सांगू शकत नाही. पण गृहविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.