कर्नाटक निवडणुकीपूर्वी शरद पवारांना दिलासा! निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; विनंती मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 02:56 PM2023-04-15T14:56:49+5:302023-04-15T14:58:23+5:30
Karnataka Election 2023: राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला केलेली विनंती मान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Karnataka Election 2023: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला. यातच कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आला. या घडामोडींमध्ये आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विनंती मान्य केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.
कर्नाटक विधान सभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. खरे तर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जेडीएसमुळे ही निवडणूक आधीच तिरंगी झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकातील २२४ विधानसभा जागांपैकी ४० ते ४५ जागा लढवणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत.
निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; विनंती मान्य
राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणूक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अखेर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय फक्त या निवडणुकीपुरता मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटक निवडणुकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी कर्नाटक निवडणूक स्वबळावर लढणार
आम्ही कर्नाटकमध्ये ४६ जागांवर निवडणुका लढणार अहोत. आमचे चिन्ह फ्रिज झाले होते. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. भाजपचा आमदाराने दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ताकद वाढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणारे आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये शरद पवार यांच्या पाच ते सहा सभा घेण्यात येणर आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांनी दिली. या निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारांची यादी निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खरे तर, गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासंदर्भात अर्जही केला होता, तो आयोगाने स्वीकारला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"