राष्ट्रवादीचा ‘विकासनामा’ प्रकाशित; विकासनाम्यातील बहुतांश प्रकल्प अर्धवट स्थितीत
By admin | Published: February 13, 2017 01:24 PM2017-02-13T13:24:40+5:302017-02-13T13:24:40+5:30
महापालिका निवडणूक जाहीर झाली असून नाशिकमध्ये सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे.
नाशिक : महापालिका निवडणूक जाहीर झाली असून नाशिकमध्ये सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपानंतर राष्ट्रवादी पक्षानेही आपला ‘विकासनामा’ सोमवारी सकाळी पक्षाच्या कार्यालयात प्रकाशित केला आहे. या विकासनाम्याच्या मुखपृष्ठावर शहरातील विविध लोकाभिमुख निवडक प्रकल्पांची छायाचित्रे छापण्यात आली आहे; मात्र यापैकी काही प्रकल्प अद्यापही पुर्णत्वास आलेले नसून अंतीम टप्प्यात काम रखडलेले आहे. तरीदेखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सरकार करंटं’ असल्याचे सांगून सदर प्रकल्प अद्यापही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. केंद्र व राज्यात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारला नाशिकमध्ये मुख्य विकासप्रकल्प पुर्णत्वास आणण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप आमदार जयंत जाधव यांनी यावेळी केला. यामुळे राष्ट्रवादीच्या पुढकाराने जे प्रकल्प साकारले गेले आहे त्यांनादेखील घरघर लागली आहेत. गंगापूरगावालगत गोवर्धन शिवारात पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने ‘कलाग्राम’चा प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प रखडला असून बांधकाम अंतीम टप्प्यात येऊन ठप्प झाले आहे तरीदेखील विकासनाम्यात हा प्रकल्प नाशिककरांना उपलब्ध करुन दिल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हातून पाठ थोपटून घेतली. तसेच गंगापूर धरणालगत बोट क्लब साकारल्याचेही विकासनाम्यात दाखविण्यात आले; मात्र या बोटक्लबच्या बोटी अद्याप धुळखात पडून असून इमारत बघण्याचीदेखील नाशिककरांना अद्याप मुभा देण्यात आलेली नाही.