मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीचे घोडे अडले
By admin | Published: September 24, 2014 04:25 AM2014-09-24T04:25:11+5:302014-09-24T04:25:11+5:30
शिवसेना आणि भाजपा महायुतीचे जागावाटप मुख्यमंत्रिपदावरून अडले होते, अशी चर्चा असताना, काँग्रेस आघाडीत याच विषयावरून रस्सीखेच सुरू आहे
नाशिक : शिवसेना आणि भाजपा महायुतीचे जागावाटप मुख्यमंत्रिपदावरून अडले होते, अशी चर्चा असताना, काँग्रेस आघाडीत याच विषयावरून रस्सीखेच सुरू आहे. सत्ता आल्यास राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे, त्यातून चर्चा रखडली आहे. काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी मंगळवारी येथे ही माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीत तणाव निर्माण झाला होता. युती तुटणार म्हणता म्हणता राहिली. अंतस्थ हा वाद जागांपेक्षा मुख्यमंत्रिपदासाठी असल्याचे सांगितले जात होते; परंतु अशाच पद्धतीने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने ज्या तीन मागण्या केल्या आहेत त्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे कॉँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला १२४ जागा देण्यास तयार आहे; परंतु राष्ट्रवादीला १४४ जागा हव्या आहेत. तसेच ज्या अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्यासाठीही जागा सोडाव्यात, अशी मागणी असल्याचे राणे यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरू आहे. चर्चेत काय मुद्दे मांडायचे हे हायकमांडने सांगितले असून, त्यानुसारच चर्चा सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)