परिवहन निवडीवरून राष्ट्रवादीत खदखद? युवक पदाधिकाऱ्याचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:38 AM2019-06-28T02:38:09+5:302019-06-28T02:38:17+5:30

परिवहन समितीच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नवीन सदस्यांची निवड होणार आहे. सदस्यपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत खदखद निर्माण झाली आहे.

NCP's Youth Worker's resigns | परिवहन निवडीवरून राष्ट्रवादीत खदखद? युवक पदाधिकाऱ्याचा राजीनामा

परिवहन निवडीवरून राष्ट्रवादीत खदखद? युवक पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Next

नवी मुंबई  - परिवहन समितीच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नवीन सदस्यांची निवड होणार आहे. सदस्यपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत खदखद निर्माण झाली आहे. परिवहन समिती सदस्यपदाचे आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलल्याने राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण लोकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

परिवहन समितीच्या निवृत्त होणाºया सहा जागांवर २९ जून रोजी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी बुधवारी नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रवीण लोकरे हे राष्ट्रवादीचे जुने व तितकेच निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या वेळी परिवहन समितीवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनीसुद्धा त्यांना असे आश्वासन दिले होते; परंतु ऐन वेळी त्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली, त्यामुळे लोकरे व त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. १८ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही केवळ आश्वासनावर बोळवण होत असेल तर यापुढे पक्षाचे काम करणार नाही, असा पवित्रा घेत लोकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा संजीव नाईक यांच्याकडे सादर केला आहे. नियमानुसार पुढील दोन-तीन दिवसांत युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना आपल्या पदाचा राजीनामा पाठविणार असल्याचे लोकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांतील खदखद समोर आल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. या प्रकरणी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

अनेक कार्यकर्ते नाराज
मागील १८ वर्षांत वारंवार मला डावलण्यात आले. महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असतानाही तिकीट नाकारण्यात आले. कधी शिक्षण तर कधी परिवहन समितीवर पाठविण्याचे आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली.
किमान या वेळी तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु या वेळीसुद्धा तोच प्रकार झाल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. युवक राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते येत्या काळात पक्षाचा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे लोकरे यांनी सांगितले.

Web Title: NCP's Youth Worker's resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.