मरावे परी कीर्तिरूपे उरावे! 20 महिन्यांच्या चिमुकलीने 5 लोकांना दिलं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 01:45 PM2021-01-14T13:45:31+5:302021-01-14T13:57:27+5:30
Organ Donation : धनिष्ठा असं या चिमुकलीचं नाव असून ती सर्वात लहान वयाची डोनर ठरली आहे.
नवी दिल्ली - मरावे परी कीर्तिरूपे उरावे अशीच एक घटना समोर आली आहे. 20 महिन्यांच्या चिमुकलीने पाच जणांना जीवदान दिले आहे. धनिष्ठा असं या चिमुकलीचं नाव असून ती सर्वात लहान वयाची डोनर ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी परिसरात राहणाऱ्या धनिष्ठाने आपल्या निधनानंतर समाजासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. 20 महिन्यांच्या धनिष्ठाने पाच जणांना तिचे अवयव दान केले. हृदय, लिव्हर, दोन्ही किडन्या आणि दोन्ही कॉर्निया दान केल्या आहेत.
8 जानेवारी रोजी संध्याकाळी धनिष्ठा आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर खेळत असताना खाली पडली होती. पडल्यानंतर तातडीने तिला उपचारासाठी बेशुद्धावस्थेत सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही या चिमुकलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी धनिष्ठाला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं. मेंदूव्यतिरिक्त तिचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत होते. अशा परिस्थितीतही चिमुकलीचे आई-वडील आशिष कुमार आणि बबिता यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे आपल्या मुलीचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली.
आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही रुग्णालयात राहून असे अनेक रुग्ण पाहिले, ज्यांना अवयवांची अतिशय आवश्यकता आहे. आम्ही आमच्या धनिष्ठाला गमावलं आहे. मात्र तिचं अवयव दान करुन, फक्त तिचे अवयव इतर रुग्णांमध्ये जिवंत राहणार नाहीत तर त्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठीही मदत होईल असं म्हटलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांसह अनेकांनी चिमुकलीच्या कुटुंबियांचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच आभार मानले आहेत.
अवयव दानाचं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. इतरांनीही यातून प्रेरणा घेतली पाहिजे, असं सर गंगा राम रुग्णालयाचे डॉ. डीएस राणा चेअरमन (बोर्ड ऑफ़ मॅनेजमेंट) यांनी म्हटलं आहे. तसंच 0.26 प्रति मिलियन इतका भारतात अवयव दानाचा सर्वात कमी दर आहे. अवयव निकामी झाल्याने दर वर्षी भारतात सरासरी 5 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अरे व्वा! परिवहन विभागाचं महत्त्वपूर्ण पाऊल, विद्यार्थ्यासाठी केला बदलhttps://t.co/c5DHTX41fK#Students#Education
— Lokmat (@MiLOKMAT) January 11, 2021