मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची महिला आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:13 AM2020-12-18T02:13:06+5:302020-12-18T02:14:33+5:30
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी २०१३ मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा तसेच या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी सातत्याने धमकावल्याचा आरोप मुंबईत राहणाऱ्या एका मॉडेलने केला आहे.
नवी दिल्ली/मुंबई/रांची : मुंबईतील एका मॉडेल तरुणीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात केलेल्या बलात्काराच्या आरोपांची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात २०१३ मध्ये तरुणीने केलेल्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती मागविण्यासाठी आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्रही पाठविले आहे.
संबंधित पीडित तरुणीने गेल्या सात वर्षांत तिच्याबाबतीत घडलेल्या प्रकारांबाबत सविस्तरपणे लिहिलेले पत्र सोशल मीडियात सध्या व्हायरल झाले आहे. महिला आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी २०१३ मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा तसेच या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी सातत्याने धमकावल्याचा आरोप मुंबईत राहणाऱ्या एका मॉडेलने केला आहे.
जुलै महिन्यात झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आवाज उठवित या कथित बलात्कार आणि अपहरण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती.