एनडीए ३८ Vs इंडिया २६; पंतप्रधान मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंचा नामोल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:27 AM2023-07-19T05:27:04+5:302023-07-19T05:27:43+5:30
‘एनडीए हे प्रादेशिक अस्मितांचे इंद्रधनुष्य’
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. ही लढाई जिंकण्यासाठी भाजपप्रणीत एनडीएने मंगळवारी दिल्लीत ३८ घटक पक्षांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले, तर बंगळुरू येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला कसे पराभूत करावयाचे यावर २६ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी विचारमंथन केले. विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. त्यामुळे येणारा मतसंग्राम ‘एनडीए’ विरोधात ‘इंडिया’ असा होणार हे स्पष्ट झाले आहे.
आघाडी बळजबरीने नव्हे तर परस्पर सहकार्याने : पंतप्रधान
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एनडीएची स्थापना बळजबरीने नव्हे तर परस्परांच्या सहकार्याने व योगदानाने झाली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला लगावला. एनडीए साकारण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रकाशसिंग बादल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अजित सिंह, शरद यादव यासारख्या नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली, असे मोदी यांनी सांगितले.
२०२४च्या लोकसभेसाठी २६ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा मुकाबला करण्याकरिता भाजपप्रणित एनडीएने ३८ पक्षांची आघाडी केली. तसेच एनडीएची दिल्लीत मंगळवारी बैठक आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतामध्ये विविध राजकीय पक्षांच्या आघाड्या होण्याची परंपरा आहे. मात्र जे केवळ नकारात्मकता पसरवितात अशा प्रवृत्ती कधीही यशस्वी होऊ शकलेल्या नाहीत.
‘आम्ही टीका करण्यासाठी परकीयांची मदत घेतली नाही’
एनडीएने नेहमी सकारात्मक राजकारणाची कास धरली आहे. आम्ही विरोधी बाकांवर होतो तेव्हाही याच धोरणाने वाटचाल केली आहे. आम्ही कधीही परकीय सत्तांची मदत घेतली नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला. राहुल गांधी यांनी अमेरिका, ब्रिटनच्या दौऱ्यांमध्ये केलेली वक्तव्य देशहितविरोधी असल्याची टीका भाजपने केली होती. त्या अनुषंगाने मोदी यांनी देखील एनडीएच्या बैठकीत राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
‘एनडीए हे प्रादेशिक अस्मितांचे इंद्रधनुष्य’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रादेशिक अस्मितांचे एनडीए हे एक सुंदर इंद्रधनुष्य आहे. या अस्मिता जपण्याचा एनडीएने नेहमी प्रयत्न केला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाला विरोध करण्यासाठी नव्हे तर देशात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी एनडीएची स्थापना केली. देशाची सुरक्षा, प्रगती, लोकांचे सबलीकरण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून एनडीए काम करत आहे. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांनी आखून दिलेल्या मार्गावर एनडीएची वाटचाल सुरू आहे.