झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:58 PM2024-10-18T13:58:18+5:302024-10-18T14:00:57+5:30

झारखंडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान पार पडेल 

NDA announces seat sharing for Jharkhand elections, AJSU 10 seats, BJP 68 to contest | झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागावाटप निश्चित झालं आहे. या निवडणुकीत आजसू १० जागांवर तर जेडीयू २, चिराग पासवान यांच्या एलजेपीला १ आणि उर्वरित ६८ जागांवर भाजपा निवडणूक लढणार आहे. केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत घोषणा केली. झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएकडून ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन, जनता दल(यू) आणि लोकजनशक्ती पार्टी मिळून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. याठिकाणी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.

आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे भाजपा सहप्रभारी हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढली जाणार आहे. भाजपा ६८ जागांवर निवडणूक लढेल तर आजसूला १० जागा देण्यात आल्या आहेत. आजसू पक्षाला देण्यात आलेल्या जागांमध्ये सिल्ली, रामगड, गोमिया, इचागड, मांडू, जुगसलिया, डुमरी, पाकुड, लोहरदगा, मनोहरपूर या जागांचा समावेश आहे. तर जेडीयूला जमशेदपूर पश्चिम, तमाड आणि चतरा येथील जागा चिराग पासवान यांच्या पक्षाला दिली आहे.

२ टप्प्यात होणार मतदान

झारखंडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान पार पडेल तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला ३८ जागांवर मतदान होईल. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगानुसार, झारखंडमध्ये एकूण मतदारांची संख्या २५ कोटी ५१ लाख ८ हजार ६४२ इतकी आहे. ज्यात पुरुष मतदार १२ कोटी ९९ लाख ७ हजार ३२५ आणि महिला मतदारांची संख्या १२ कोटी ५२ लाख ९१० इतकी आहे.

झारखंडमध्ये किती जागांवर लढत?

दरम्यान, छोटा नागपूरच्या पठारवरील जंगलांनी वेढलेल्या झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागांसाठी लढत होणार आहे. विधानसभेत सरकार आणण्यासाठी ४२ जागांचे बहुमत आणावे लागेल. मागील २०१९ च्या निवडणुकीत ३० जागा जिंकून झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष बनला होता. 

महाराष्ट्राचं जागावाटप कधी?

झारखंडसोबत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक होणार आहे. याठिकाणी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होईल आणि २३ नोव्हेंबरला झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाईल. झारखंडमध्ये एनडीएचं जागावाटप झालं परंतु अद्याप महाराष्ट्रातील जागावाटप निश्चित नाही. महाराष्ट्रात महायुतीत भाजपा सर्वाधिक जागा लढणार हे स्पष्ट असले तरी शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
 

Web Title: NDA announces seat sharing for Jharkhand elections, AJSU 10 seats, BJP 68 to contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.