बिहारमधील जागावाटपावर एनडीएचं ठरलं, भाजपा १६० जागांवर लढणार
By admin | Published: September 14, 2015 02:00 PM2015-09-14T14:00:34+5:302015-09-14T14:01:40+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर अखेर तोडगा निघाला असून भाजपा १६० जागांवर निवडणूक लढवणार आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १४ - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर अखेर तोडगा निघाला असून भाजपा १६० जागांवर, लोकजनशक्ती पक्ष -४०, राष्ट्रीय लोकसमता पक्ष - २३ आणि जितनराम मांझी यांचा हिंदूस्तान आवाम मोर्चा - २० जागांवर निवडणूक लढवणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर एनडीए निवडणूक लढवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचे प्रमुख प्रचारक असतील असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
बिहारमध्ये दिवाळीच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होणार असून जनता परिवार व काँग्रेस महाआघाडीचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर गेल्या काही दिवसांत चर्चा सुरु होती. सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत एनडीएतील जागावाटपाविषयीची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, जितनराम मांझी आदी नेतेही उपस्थित होते. भाजपा व मित्रपक्षात जागावाटपावर समाधानकारक तोडगा निघाला असून आमच्यात कोणतीही नाराजी नाही असे शहा यांनी स्पष्ट केले. जंगलराज व भ्रष्टाचारात बिहारचा विकास होऊ शकत नाही असे सांगत अमित शहांनी नितीशकुमारांवरही निशाणा साधला आहे. एनडीएतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतील असे शहा यांनी सांगितले आहे.