राष्ट्रपतिपदासाठी ९९% मतदान; एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड, गुरुवारी होणार मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:01 AM2022-07-19T06:01:23+5:302022-07-19T06:02:19+5:30
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोवा, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड आदी १० राज्ये व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ९९ टक्के मतदान झाले असून, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड आदी १० राज्ये व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले. येत्या गुरुवारी मतमोजणी रोजी होणार आहे.
राष्ट्रपतिपदासाठी एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड आहे. संसद भवनमधील एक मतदान केंद्र व विविध राज्यांतील विधानसभांमध्ये उभारलेली ३० मतदान केंद्रे अशा ३१ ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.
४४ खासदारांचे राज्यात मतदान
एकूण ४४ खासदारांना त्यांच्या राज्यात, नऊ आमदारांना संसद भवनात तर दोन आमदारांना दुसऱ्या राज्यातील मतदान केंद्रात मतदान करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली होती.
राज्यातील चार खासदारांसह आठ जणांनी नाही केले मतदान
मतदान न करणाऱ्या आठ खासदारांमध्ये महाराष्ट्रातील गजानन कीर्तिकर (शिवसेना), हेमंत गोडसे (शिवसेना), इम्तियाज जलील (एआयएमआयएम), संजय धोत्रे (भाजप) यांचा समावेश होता. संजय धोत्रे यांच्यावर एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुर आहेत. भाजपचे खासदार व अभिनेता सनी देओल हे वैद्यकीय उपचारांसाठी विदेशात गेले आहेत. भाजप, शिवसेना यांचे प्रत्येकी दोन, बसप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, एआयएमआयएमचा प्रत्येकी एक अशा आठ खासदारांनी मतदान केले नाही.
१००% मतदान
छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरी.
क्रॉस व्होटिंग झाल्याची शक्यता
राष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीकरिता विविध राज्यांतील विधानसभा सदस्यांनी सोमवारी मतदान केले. मात्र, या मतदानात क्रॉस व्होटिंगचे प्रकार घडले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.