मोदी सरकारच्या काळात युपीए सरकारपेक्षा 73 टक्के जास्त महामार्गांची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 12:02 PM2018-06-13T12:02:09+5:302018-06-13T12:08:00+5:30
रालोआ सरकारने रस्तेबांधणी क्षेत्राला विशेष महत्त्व दिल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे
नवी दिल्ली- गेल्या चार वर्षांमध्ये युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा 71 टक्के अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकारने रस्ते बांधणीच्या क्षेत्रात केलेल्या वेगवान प्रगतीचे कौतुक केले जात आहे. या सरकारने पहिल्या चार वर्षांमध्येच 28,531 किमी राष्ट्रीय महामार्गांची बांधणी केली आहे तर संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये 16,505 किमी इतक्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते.
रालोआ सरकारने रस्तेबांधणी क्षेत्राला विशेष महत्त्व दिल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. 2017-18 या वर्षी राष्ट्रीय महामार्गांची सर्वात जास्त निर्मिती झाली. या वर्षभरात 9 हजार 829 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले तर 2016-17 या वर्षभरात 8 हजार 231 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले.
2015-16 या वर्षी 6 हजार 61 किमी लांबीचे तर 2014-15 या वर्षी 4 हजार 410 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते. 2010-11 या वर्षी 4,500 किमीचे तर 2011-12 या वर्षभरात केवळ 2,013 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले. 2012-13 या वर्षी 5,732किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले होते.
संपुआ सरकारच्या 2010-11 ते 2014 ते 15 या काळात प्रतीदिन सरासरी 11.27 किमी या वेगाने रस्त्यांची निर्मिती झाली होती. मात्र सध्याच्या सरकारने या चार वर्षांमध्ये प्रतीदिन 19.5 किमी रस्त्यांची बांधणी केली आहे. 2014-15 या साली नव्या सरकारने 11.67 किमी प्रतिदिन वरुन रस्तेबांधणीची सरासरी 12 किमी वर नेली. 2015-16 मध्ये ती 22.5 झाली तर 2016-17मध्ये 22.5 आणि 2016-17मध्ये त्याच्याहीपुढे जात प्रतीदिन 26.9 किमीचा वेग गाठण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठवहनमंत्री नितिन गडकरी यांनी प्रतीदिन 45 किमी वेगाने रस्ते बांधण्याचे ध्येय ठेवले आहे.