"एनडीएकडे बहुमत, आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास", जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 20:42 IST2024-12-10T20:30:29+5:302024-12-10T20:42:24+5:30
Kiren Rijiju : किरेन रिजिजू यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

"एनडीएकडे बहुमत, आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास", जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले
नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर 60 सदस्यांच्या सह्या असून, त्यांनी राज्यसभेच्या महासचिवांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. यावरून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधी 'इंडिया'आघाडीने केलेली कृती अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
किरेन रिजिजू यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, सरकारला जगदीप धनखड यांचा खूप अभिमान आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे अतिशय निष्पक्ष असतात. राज्यसभा असो किंवा लोकसभा विरोधकांनी सभापतींच्या प्रतिष्ठेचा अनादर केला आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आघाडीने सभापतींच्या सूचनांचे पालन न करून सातत्याने गैरवर्तन केले आहे, असे किरेन रिजिजू म्हणाले.
सभापती जगदीप धनखड हे सामान्य पार्श्वभूमीतून आले आहेत. ते नेहमी संसदेच्या आत आणि बाहेर शेतकरी आणि लोकांच्या हिताबद्दल बोलतात. ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांचा आदर करतो. जो प्रस्ताव देण्यात आला आहे आणि ज्या 60 खासदारांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्या 60 खासदारांच्या कृतीचा मी निषेध करतो. एनडीएकडे बहुमत आहे आणि आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सभागृहाचे मार्गदर्शन केले आहे, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असे किरेन रिजिजू यांनी सांगितले.
दरम्यान, पहिल्यांदाच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर 60 सदस्यांच्या सह्या असून, त्यांनी राज्यसभेच्या महासचिवांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. जर हा प्रस्ताव मांडला गेला तर तो मंजूर करण्यासाठी या पक्षांना साधारण बहुमताची आवश्यकता असेल, परंतु 243 सदस्यांच्या सभागृहात त्यांच्याकडे आवश्यक संख्या नाही.