बिहारमध्ये NDAतील तिढा सुटला: विनोद तावडेंनी जाहीर केलं जागावाटप; कोणाला किती जागा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 06:00 PM2024-03-18T18:00:48+5:302024-03-18T18:03:23+5:30
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली आहे.
Bihar NDA Seat Sharing ( Marathi News ) : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही मित्रपक्षांची संख्या वाढल्याने एनडीएच्या जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. मात्र अखेर आज एनडीएतील हा तिढा सुटला असून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली आहे. बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत असून त्याखालोखाल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाला जागा मिळाल्या आहेत.
विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एनडीएच्या माध्यमातून भाजप १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आहे, तर जेडीयूला १६ जागा, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला ५ जागा, हिंदुस्तान अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.
"आम्ही पाच पक्ष बिहारमध्ये वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवणार असलो तरी ४० मतदारसंघांमध्ये आम्ही एनडीए म्हणून ताकदीने लढणार असून सर्व मतदारसंघांमध्ये विजय मिळवू," असा विश्वासही विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
#WATCH | NDA seat sharing in Bihar: BJP National General Secretary Vinod Tawde says, "BJP will contest on 17 seats, JDU on 16 seats, LJP (Ram Vilas) on 5 seats, Hindustani Awam Morcha and Rashtriya Lok Morcha on one seat each..." pic.twitter.com/s1TpdoQBza
— ANI (@ANI) March 18, 2024
दरम्यान, देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपसोबत जाणं पसंत केलं. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसोबतची युती तोडून नितीश कुमारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर ते भाजपसोबत एनडीएच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार, हे निश्चित होतं. मात्र त्यांच्यासोबत इतरही मित्रपक्ष असल्याने एनडीएच्या जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. आता अखेर हा तिढा सुटला असून जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे.