मंत्री जमीन पर! मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चात मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 11:23 AM2018-12-24T11:23:51+5:302018-12-24T11:29:21+5:30
गेल्या 4 वर्षांमध्ये मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट
नवी दिल्ली: गेल्या साडेचार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर सातत्यानं टीका झाली. मोदी देशात कमी अन् परदेशात जास्त असतात, असं टीकास्त्र विरोधकांनी वारंवार सोडलं. मात्र मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या विमान प्रवास खर्चात गेल्या चार वर्षांमध्ये सातत्यानं घट होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही संपूर्ण आकडेवारी प्राप्त झाली आहे.
मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर नेमका किती खर्च झाला, असा प्रश्न माहिती अधिकारातून विचारण्यात आला. या अर्जाला कॅबिनेटच्या जमाखर्च विभागानं उत्तर दिलं आहे. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2018 या कालावधीत कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांचा विमान खर्च 225.30 कोटी रुपये झाल्याची माहिती यातून समोर आली. तर राज्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर आलेला खर्च 13.75 कोटी रुपये इतका आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 25 कॅबिनेट, 45 राज्यमंत्री आहेत. यातील 11 जणांकडे स्वतंत्र प्रभार आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांमध्ये मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांच्या विमान खर्चात सातत्यानं घट झाली आहे. 2014-2015 या कालावधीत यावर 90.88 कोटींचा खर्च झाला. मात्र यामध्ये यूपीएच्या मंत्र्यांच्या खर्चाचादेखील समावेश आहे. यूपीए आणि एनडीए मंत्र्यांच्या प्रवासावरील खर्चाची वर्गवारी आरटीआयमधून देण्यात आलेली नाही. तर पंतप्रधानांच्या आतापर्यंतच्या परदेश दौऱ्यावरील विमान प्रवासाचा खर्च 2,021.58 कोटी रुपये आहे.
मोदींच्या मंत्र्यांचा परदेश दौऱ्यावरील विमान प्रवासाचा खर्च
2014-15 90.88 कोटी
2015-16 80.51 कोटी
2016-17 40.02 कोटी
2017-18 27.64 कोटी