जागावाटपावरून एनडीएत रस्सीखेच, बिहारमध्ये अधिक जागा मिळवण्यासाठी जेडीयूची मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 08:49 PM2018-06-24T20:49:34+5:302018-06-24T20:57:37+5:30
लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे भाजपाच्या मित्रपक्षांनी दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.
पाटणा - लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे भाजपाच्या मित्रपक्षांनी दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शिवसेना दर दिवशी स्वबळाचा नारा देत असतानाचा तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने लोकसभेच्या जागावाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी चाली खेळण्यास सुरुवात केली आहे.
बिहारमध्ये एनडीएमध्ये सहभागी असलेल्या चार पक्षांना २०१५ विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर जागा दिल्या जाव्यात, असा प्रस्ताव जनता दल युनायटेड पक्षाने दिला आहे. असे झाल्यास जेडीयूला अधिकाधिका लाभ मिळू शकतो कारण २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूची कामगिरी चांगली झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना २०१५ च्या निकालांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे जेडीयूचे म्हणणे आहे. मात्र जेडीयूचा हा प्रस्ताव भाजपा, लोजपा, आणि आरएलएसपी या पक्षांना मान्य होण्याची शक्यता कठीण आहे. त्यामुळे पुढच्या काळात बिहारमधील एनडीएमध्ये मतभेद उफाळण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा असून, २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने २२, लोकजनशक्ती पार्टीने ६ आणि आरएलएसपीने ३ जागा जिंकल्या होत्या.