मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीएला मिळणार 360 जागा
By admin | Published: January 26, 2017 11:01 PM2017-01-26T23:01:43+5:302017-01-27T00:13:02+5:30
लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीए पुन्हा 360 खासदारांसह केंद्रातील सत्तेत येऊ शकते.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - केंद्रातल्या मोदी सरकारला जवळपास अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र तरीही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. इंडिया टुडे ग्रुप आणि KARVY INSIGHTS च्या सर्व्हेनुसार लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीए पुन्हा 360 खासदारांसह केंद्रातील सत्तेत येऊ शकते. यूपीएला 60 जागा, तर इतर पक्षांना 123 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 राज्यांमधील 12,143 लोकांनी केलेल्या सर्व्हेनुसार आता निवडणुका लागल्यास भाजपा नेतृत्वाखालील एनडीएला 42 टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएला फक्त 25 टक्के मतं मिळाली आहेत.
यूपीएच्या तुलनेत एनडीए दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचं या पोलमधून समोर आलं आहे. इतर पक्षांना 33 टक्के मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान म्हणून मोदी चांगलं काम करत असल्याचं 69 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तसेच मोदींच्या कामाला 19 टक्के लोकांनी सरासरी पसंती दिली आहे. तर 3 टक्के लोकांनी कामगिरी वाईट, 6 टक्के लोकांनी अतिशय वाईट अशी प्रतिक्रिया दिली आहे.
एनडीए सरकारच्या कामाला 71 टक्के लोकांनी चांगलं म्हटलं आहे. 97 संसदीय आणि 194 विधानसभा क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून योग्य पर्याय असतील. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना 65 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर राहुल गांधींना फक्त 10 टक्के, तर सोनिया गांधींना 4 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. मुलायम सिंह यादव, मायावतींना प्रत्येकी 1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अरुण जेटलींना 2 टक्के लोक पंतप्रधानपदाचे उमेदवार मानतात. तर केजरीवाल, प्रियंका, नितीशकुमार यांना 2 टक्के लोकांनी निवडलं आहे. नोटाबंदीच्या मोदींच्या निर्णयामुळे 45 टक्के लोकांनी काळा पैशाला आळा बसल्याचं म्हटलं आहे. तर 35 टक्के लोकांनी अर्थव्यवस्था सुधारल्याचं मत मांडलं आहे. अरुण जेटलींच्या कामाला 23 टक्के, तर सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंह यांच्या कारभाराला 21 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. मनोहर पर्रिकरांना 13 टक्के तर उमा भारतींनी 12 टक्के चांगलं काम केल्याचं म्हटलं आहे. मोदींविरोधात तिसरा पर्याय म्हणून 11 टक्के लोकांनी केजरीवालांना पसंती दिली आहे. नितीशकुमारच्या नेतृत्वात 10 टक्के लोकांना चांगलं भविष्य दिसत आहे.