एका वर्षानंतर एनडीएला राज्यसभेतही मिळणार बहुमत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:45 PM2019-05-27T13:45:51+5:302019-05-27T13:46:23+5:30
लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजपा आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे.
नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने जबरदस्त विजय मिळवला आहे. केवळ एनडीएच नाही तर भाजपालाही स्वबळावर 303 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजपा आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांत लोकसभेमध्ये बहुमत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपाने आणलेली अनेक महत्त्वाची विधेयके रखडली होती. मात्र आता वर्षभरातच राज्यसभेमध्ये बहुमताचा आकडा पार करण्याचे भाजपाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे.
245 सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेमध्ये बहुमतासाठी 123 खासदारांची गरज असते. मात्र आजच्या घडीला एनडीएकडे 102 सदस्य आहेत. त्यामुळे एनडीए राज्यसभेतील बहुमतापासून 21 जागांनी दूर आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएकडे 66 खासदार आहेत. तर दोन्ही आघाड्यांपासून दूर असलेल्या पक्षांकडे 66 सदस्य आहेत.
नोव्हेंबर 2020 पर्यंत 14 राज्यांमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांमधून एनडीए बहुमतासाठी कमी पडत असलेल्या 21 खासदारांची तूट भरून काढेल, असी शक्यता आहे. या निवडणुकीमधून भाजपा आणि मित्रपक्षांना मिळून 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित पाच जागांची भरपाई वायएसआर काँग्रेसच्या पाठिंब्याने करता येऊ शकते. तसेच पुढील वर्षी उत्तर प्रदेशातील 10 जागा रिक्त होणार असून, त्यातील बहुतांश जागा भाजपाच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.
राज्यसभेमध्ये सध्या एनडीएचे असे आहे पक्षीय बलाबल
भाजपा -73
अण्णा द्रमुक - 13
जेडीयू - 6
अकाली दल - 3
शिवसेना - 3
स्वीकृत - 3
आरपीआय -1