कोरोनाशी संबंधित निर्बंध संपणार! केंद्राच्या राज्य सरकारांना नियमांचा पुनर्विचार करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:22 PM2022-03-23T15:22:05+5:302022-03-23T15:23:13+5:30
केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना व्हायरसशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबाबत आवश्यक सल्ला दिला आहे.
केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना व्हायरसशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबाबत आवश्यक सल्ला दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना विषाणू (कोविड -19) च्या प्रतिबंधासाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं रद्द करण्याचा विचार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी करावा, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. मास्कच्या वापरासह इतर कोविड प्रतिबंधक उपायांवरील सल्ले यापुढे सुरूच राहतील, असंही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी, सरकारनं परिस्थिती सुधारण्यासाठी आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर NDMA ने निर्णय घेतला की कोविड प्रतिबंधक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी लागू करण्याची आता गरज नाही.
25 फेब्रुवारी 2022 रोजी गृह मंत्रालयाचा सध्याचा आदेश क्रमांक 40-3/2020-DM-1 (A) च्या समाप्तीनंतर, गृह मंत्रालयानं आता नवा कोणताही आदेश जारी करणार नाही असं सांगितलं जात आहे. पण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MDHFW) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सल्ला देत राहील. यामध्ये मास्कचा वापर करणं आणि वारंवार हात स्वच्छ करणं यांचा समावेश असेल. गेल्या 24 महिन्यांत, रोग निदान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार आणि लसीकरणासोबतच रुग्णालयातील पायाभूत सुविधा, जागरूकता आणि सामान्य लोकांसाठी सुविधांचा विकास यासारख्या विविध बाबी हाती घेण्यात आल्या आहेत. महामारीच्या व्यवस्थापनासाठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं सरकारनं आपल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे.
Correction | Union Home Secretary writes to all Administrators, advises them to consider appropriately discontinuing issue of guidelines under Disaster Mgmt Act for Covid containment measures.
— ANI (@ANI) March 23, 2022
Advisories on Covid containment measures, including use of face masks will continue. pic.twitter.com/5kbCeKMzSe
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी उचललं पाऊल
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही त्यांच्या बाजूनं सर्व पावले उचलली आहेत, असं सरकारच्या वतीनं असे सांगण्यात आलं आहे. यासाठी स्वतःची यंत्रणा राज्यांनी विकसित केली आहे आणि साथीच्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या विस्तृत योजनांची अंमलबजावणी केली आहे. यासोबतच गेल्या सात आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 0.28 टक्क्यांवर आला आहे.
देशात किती रुग्ण नोंदवले गेले?
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एकूण 1,778 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2,542 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 62 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,30,12,749 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्ण 23,087 इतके आहेत. एकूण मृत्यू 5,16,605 आणि एकूण लसीकरण 1,81,89,15,234 इतकं आहे.