एनडीआरएफच्या तुकड्या आंध्रात
By admin | Published: October 13, 2014 03:03 AM2014-10-13T03:03:04+5:302014-10-13T03:03:04+5:30
हुडहुड’ चक्रीवादळ आंध्रातील विशाखापट्टणम येथे धडकताच राष्ट्रीय आपत्तीनिवारण कृती दलाने (एनडीआरएफ)मदत व बचाव कार्यासाठी आपल्या आणखी सात तुकड्या रवाना केल्या आहेत़
नवी दिल्ली : ‘हुडहुड’ चक्रीवादळ आंध्रातील विशाखापट्टणम येथे धडकताच राष्ट्रीय आपत्तीनिवारण कृती दलाने (एनडीआरएफ)मदत व बचाव कार्यासाठी आपल्या आणखी सात तुकड्या रवाना केल्या आहेत़ परिणामी आता विशाखापट्टणम येथे आता एनडीआरएफच्या एकूण १३ तुकड्या तैनात असतील़ एनडीआरएफच्या एका तुकडीत सामान्यत: ५० जण असतात़ आंध्र आणि ओडिशात मिळून एनडीआरएफच्या एकूण ४४ तुकड्या तैनात आहेत़
येते सहा तास हुडहुड चक्रीवादळाची तीव्रता कायम राहणार आहेत़ तथापि ओडिशाच्या अंतर्गत भागात आणि छत्तीसगडसह उत्तर-पश्चिमकडे सरकताच पुढील आणखी सहा तासांत हुडहुडची तीव्रता कमी होणार आहे़ याच्या प्रभावामुळे तेलंगण, दक्षिण ओडिशाच्या शेजारील दक्षिण छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे़ उत्तर आंध्रच्या पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, विजयनगरम आणि ओडिशाच्या गंजाम, गजपति, कोरापूट तसेच मल्कानगिरी जिल्ह्णात या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवेल़
चक्रीवादळामुळे उद्भवू शकणारा संभाव्य धोका बघता कालच आंध्र किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांतील सुमारे १.११ लाख नागरिकांना तर ओडिशाच्या गंजम जिल्ह्णातील ३.५ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती मदत दलाची पथके १९९ रबरी नावांनिशी दोन्ही राज्यातील या आपत्तीला तोंड द्यायला सज्ज आहेत़ याखेरीज हवाईदलालाही हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)