एनडीआरएफच्या जवानाने सर्वप्रथम दिली माहिती; ‘लाइव्ह लोकेशन’मुळे तत्काळ मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 05:23 AM2023-06-05T05:23:29+5:302023-06-05T05:25:20+5:30
बचाव पथक येईपर्यंत ते मोबाइल टॉर्चच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढत होते.
बालासोर : एनडीआरएफचे जवान व्यंकटेश (३९) यांनी सर्वप्रथम ओडिशा रेल्वे अपघाताची बातमी त्यांच्या नियंत्रण कक्षाला पाठवली. ते कोरोमंडल एक्स्प्रेसने रजेवर घरी जात होते. घटनास्थळाचे ‘लाइव्ह लोकेशन’ त्यांनी नियंत्रण कक्षाला व्हॉटसॲॅपवर पाठवले. त्यामुळे बचाव पथक घटनास्थळी तत्काळ पोहोचू शकले.
बचाव पथक येईपर्यंत ते मोबाइल टॉर्चच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढत होते. अपघातावेळी त्यांचा डबा रुळावरून घसरला होता, पण, पुढे असलेल्या डब्यांशी त्याची टक्कर झाली नाही. यामुळे ते बचावले.
व्यंकटेश म्हणाले, ‘अपघात होताच मला जोरदार धक्का बसला आणि नंतर मला माझ्या डब्यात काही प्रवासी पडताना दिसले. मी पहिल्या प्रवाशाला बाहेर काढले आणि त्याला रेल्वे रुळांंजवळच्या दुकानात बसवले. त्यानंतर मी इतरांच्या मदतीसाठी गेलो. मी कोलकाता कार्यालयात अपघाताचे काही फोटो आणि थेट स्थान पाठवले. तेथील औषधी दुकानाच्या मालकासह स्थानिक लोकच खरे तारणहार होते.’ एनडीआरएफचे महासंचालक मोहसेन शाहिदी म्हणाले, ‘एनडीआरएफचे जवान नेहमी ड्युटीवर असतात.’