जम्मूत संतप्त नागरिकांचा एनडीआरएफच्या जवानावर हल्ला
By admin | Published: September 10, 2014 02:09 PM2014-09-10T14:09:17+5:302014-09-10T15:38:43+5:30
पूरग्रस्त श्रीनगरमध्ये बचावकार्य करणा-या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना बुधवारी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.१० - पूरग्रस्त श्रीनगरमध्ये बचावकार्य करणा-या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना बुधवारी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. बचावकार्य करणा-या एनडीआरएफच्या पथकावर नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला उपचारासाठी चंडीगढ येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला असून अद्यापही अनेक भागांमधील पाणी ओसरलेले नाही. बुधवारी एनडीआरएफचे पथक पूरग्रस्त भागात बचावकार्य करत होते. एनडीआरएफने एका विशिष्ट विभागावरच लक्ष द्यावे असे स्थानिकांना वाटत होते. मात्र एनडीआरएफच्या जवानांनी मदतीसाठी अन्य विभागाकडे मोर्चा वळवला असता नागरिकांचा पारा चढला. संतप्त जमावाने एका जवानाला मारहाण केली. यात त्या जवानाच्या हाताला दुखापत झाली आहे. मंगळवारपासून एनडीआरएफच्या जवानांना अशा विचित्र घटनांना सामोरे जावे लागत आहे असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. या घटनांची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. एनडीआरएफच्या जवानांना सीआरपीएफचे सुरक्षा कवच देऊन मदतकार्य करण्याचे निर्देशही दिले आहे. याविषयी एनडीआरएफचे अधिकारी म्हणाले, यामुळे बचावकार्याचा वेग मंदावतो. बोटीत जागा कमी असते. त्यात सीआरपीएफचे जवानही आल्यास बोटीत नागरिकांना कमी जागा मिळेल.
राज्यातील अन्य पूरग्रस्त भागांमध्येही नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. सरकारने मदतीसाठी काहीच प्रयत्न केले नाही असा आरोप या नागरिकांनी केला आहे. काही ठिकाणी नागरिकांनी पाहणीसाठी आलेल्या नेत्यांना घेराव घातल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, अद्याप पूरात अडकलेले चार लाख नागरिक मदतीची प्रतिक्षा करत असून त्यांच्या सुटकेसाठी ७९ विमान आणि हेलिकॉप्टर मदतकार्य करत आहे. सैन्याच्या ३२९ तुकड्या आणि एनडीआरएफच्या १९ तुकड्या बचाव कार्यात सामील आहेत. आत्तापर्यंत बचाव पथकांनी ७६ हजार ५०० नागरिकांची सुटका केली आहे.