नीट परीक्षेचे प्रवेशपत्र दोन दिवसांत जारी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:04 AM2020-08-21T05:04:18+5:302020-08-21T07:09:07+5:30
एनटीएने सोमवारी रात्रीच जेईई मेन परीक्षेसाठीचे प्रवेश जारी केले असून, शनिवारपर्यंत ‘नीट’ परीक्षेसाठी प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) जारी केले जातील.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ठरल्या वेळीच होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राष्टÑीय परीक्षा संस्था प्रवेश परीक्षा घेण्याच्या तयारीला लागली आहे. एनटीएने सोमवारी रात्रीच जेईई मेन परीक्षेसाठीचे प्रवेश जारी केले असून, शनिवारपर्यंत ‘नीट’ परीक्षेसाठी प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) जारी केले जातील.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी आॅफलाईन घेण्यात येणार आहे. नीट परीक्षेसाठी १५.९७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, देशभरात ३,८५० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.
कोविड-१९ च्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत येण्यास सांगण्यात आले आहे. पालकांना परीक्षा केंद्राबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याआधी विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान तपासण्यात येणार आहे. ताप जास्त असल्यास परीक्षा देण्यास मनाई केली जाईल. कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीनेही मार्गदर्शक निर्देश तयार केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
>८.५ लाख परीक्षार्थी
ंजेईई मेन परीक्षा सलग सहा दिवस दोन सत्रांत आयोजित करण्यात आली असून, ८.५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नीट परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळी आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन परीक्षा आॅन स्क्रीन संगणकआधारित असेल, तर नीट परीक्षा आॅफलाईन (पेन-पेपर) घेतली जाणार आहे.