‘ऑनलाइन’ने विद्यार्थी, तरुणाईची मोडली मान; स्क्रीन टाइम वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:52 AM2020-06-20T04:52:28+5:302020-06-20T06:48:29+5:30
मान, मणका, खांदा, मनगट यांचा त्रास झाला सुरू
- संतोष मिठारी / सतीश पाटील
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांबरोबरच शिक्षणात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीचा समावेश झाला आहे. शिक्षण, मनोरंजनासाठी कोल्हापुरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणाईचा स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाइम वाढला आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे विद्यार्थी, तरुणाईला मान, खांदा, मनगटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लोकांमध्ये स्मार्टफोनसह अन्य गॅझेटचा वापर वाढला आहे. त्यात विद्यार्थी, तरुणाईचा अधिक समावेश आहे. त्यांचा स्क्रीन टाइम रोज किमान तीन ते चार तासांचा आहे. या गॅझेटचा वापर करताना प्रमाणापेक्षा मान खाली घातल्याने मानेच्या हाडांची झीज होऊन मानदुखीचा त्रास सुरू होतो. मानेवर ताण वाढल्याने त्याचा पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. त्यामुळे सध्या मान, मणका, खांदा, मनगटदुखीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी गॅझेटचा वापर योग्य पद्धतीने आणि गरजेपुरताच करण्याची आवश्यकता आहे.
जितकी खाली मान, तितका अधिक ताण
सामान्य स्थितीत माणसाच्या डोक्याचे वजन पाच किलो, तर शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्याचे वजन अडीच ते तीन किलोपर्यंत असते. ज्यावेळी मान वाकविली जाते त्यावेळी गुरुत्त्वाकर्षण शक्तीमुळे मानेच्या स्नायूंवर ताण येतो. जितक्या अंशांमध्ये मान ही हनुवटीच्या दिशेने खाली जाईल, तितका अधिक ताण हा मानेवर पडल्याने त्याचा त्रास होतो.
घरात ऑनलाइन शिक्षण घेणे अडचणीचे
घरात शाळेसारखे वातावरण नसते. विविध अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लक्ष केंद्रित होत नाही. दिवसातून ४ तास आॅनलाइन शिक्षण होते. त्यासाठी नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी स्मार्टफोन घेऊन बसावे लागते. त्यामुळे मान आणि कंबरदुखीचा त्रास होतो, असे विद्यार्थिनी अंकिता देसाई हिने सांगितले.
असा होतो त्रास
मान आणि पाठीच्या भागांमध्ये वेदना
मानेची हालचाल करताना त्रास होतो.
खांदा, हात, कोपरा, मनगटदुखी होते.
हे करणे आवश्यक
गॅझेटवर तासन्तास काम करण्याऐवजी ठरावीक वेळेनंतर विश्रांती घ्यावी.
मान, मणक्यांच्या नसा मोकळ्या होणारा व्यायाम करावा.
स्मार्टफोन वापरताना मान ताठ ठेवावी.
गॅझेट डोळ्यांच्या समपातळीवर ठेवावे.
पालकांनी दक्षता घेणे आवश्यक
मोबाइलची स्क्रीन लहान असते. त्यामुळे यावर अभ्यास करताना सतत डोळे आणि मान घालावी लागल्याने स्रायूंवर ताण वाढतो. १५, ३० किंवा ४० अंशांत मान वाकते तेव्हा डोके दुखणे, मानेचा त्रास, पाठदुखी हे आजार मुलांना उद्भवू शकतात. त्यामुळे पालकांनी योग्य दक्षता घेणे आवश्यक असल्याचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राहुल बडे यांनी सांगितले.
स्नायू मोकळे होणारे व्यायाम करा
स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, आदींवर काम करणे, शिक्षण घेण्याच्या प्रमाणासह मान, पाठदुखीने त्रस्त असणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे या गॅझेट्सची स्क्रीन योग्य अंतरावर ठेवावी. ठरावीक वेळेनंतर मान, खांद्याची हालचाल करावी. डोळ्यांना त्रास होणार नाहीत, अशा ग्लास या गॅझेटला लावाव्यात. स्मार्टफोनसाठी स्टँडचा वापर करावा. मान, मणक्यांचे स्नायू मोकळे होणारे व्यायाम करावे. - डॉ. उमेश जैन, अस्थिरोगतज्ज्ञ