स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव; साबरमतीत आज कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:52 AM2021-03-11T05:52:22+5:302021-03-11T05:53:01+5:30
लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे -मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली त्या घटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षाला येत्या शुक्रवारी १२ मार्च रोजी गुजरातमधील साबरमती आश्रमात होणाऱ्या एका कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे. या अमृतमहोत्सवात देशातील सर्व खासदार व लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशभरातील ७५ ठिकाणी ७५ आठवड्यांत विविध कार्यक्रम होणार आहेत. कोरोना लस घ्यावी यासाठी खासदारांनी जनजागृती करावी. लस घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना लोकांची आरोग्य केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करावे.
भाजपचा कार्यविस्तार
या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात भाजपने देशातील कानाकोपऱ्यातल्या जनतेला खूप मदत केली आहे, तसेच आपल्या कार्याचा विस्तार केला आहे.