Corona Vaccine: व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बुस्टर डोसची गरज, AIIMS प्रमुखांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:51 AM2021-07-25T11:51:05+5:302021-07-25T11:51:26+5:30
Corona vaccine : भविष्यात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवी दिल्ली: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(AIIMS) नवी दिल्लीचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना लसीवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत आणि भविष्यात अजून व्हेरिएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत व्हॅक्सीनच्या बुस्टर डोसची गरज असल्याचं मत गुलेरिया यांनी व्यक्त केलंय.
लसीच्या दोन दोसनंतर बुस्टर डोस
डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, भविष्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची संकेत मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज असेल. सध्या उपलब्ध असलेली सेकेंड जनरेशनची व्हॅक्सीन कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटवरही परिणाम दाखवत आहे. पण, भविष्यात काय परिस्थिती येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे तेव्हा या बुस्टर डोसची गरज पडेल. सध्या बुस्टर डोसवर काम सुरूआहे. देशातील सर्वांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर हा बुस्टर डोस दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सप्टेंबरपासून लहान मुलांचे लसीकरण
यावेळी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचे लसीकरण सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन यात सर्वात पुढे आहे. या लसीच्या ट्रायल्यचे परिणाम सप्टेंबरपर्यंत मिळतील. त्यानंतर याच्या आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळेल. कोव्हॅक्सीनशिवाय जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनचेही परिक्षण अंतिम टप्प्यात आहे.